उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडून नालेसफाईची पाहणी
By सदानंद नाईक | Published: June 18, 2024 09:14 PM2024-06-18T21:14:02+5:302024-06-18T21:14:25+5:30
यावेळी महापालिका अधिकारी, ठेकेदार यांना नालेसफाई जलद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात नालेसफाई बाबत विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर, आयुक्त अजीज शेख यांनी मंगळवारी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी, ठेकेदार यांना नालेसफाई जलद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची व रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. शहर पूर्वेतील नेताजी चौक येथील न्यू इंग्लिश शाळेमागील नाला, २५ सेक्शन, नुतन नगर, हिरापुरी चौक येथील नाला तसेच एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी मंगळवारी केली. उल्हासनगर स्टेशन, भारतनगर, सीएचएम कॉलेज आदी जवळील वालधुनी नदी तसेच नाल्याची पाहणी केली आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी संबंधित ठेकेदार व त्याचे प्रतिनिधी, संबंधित विभाग प्रमुख व स्वच्छता निरीक्षक यांना जलद नाले सफाईचे निर्देश दिले. मोठ्या नाल्यांसह लहान नाल्यांचेही त्वरित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त, जमीर लेंगरेकर, किशोर गवस, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, शहर अभियंता, तरुण सेवकानी, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार आदीजन उपस्थित होते.