उल्हासनगरातील नालेसफाईची आयुक्तांकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: June 30, 2023 05:38 PM2023-06-30T17:38:07+5:302023-06-30T17:38:19+5:30
नालेसफाई नंतर, पाणी साठणाऱ्या ठिकाणांची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी करून स्वछता निरीक्षकांना सूचना केल्या आहेत.
उल्हासनगर : संततधार पावसाने नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी आल्याच्या घटना घडल्यानंतर, आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी नाले सफाईची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, विनोद केणी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
उल्हासनगरात संततधार पावसामुळे गोलमैदान, राजीव गांधीनगर, फर्निचर मार्केट, मयूर हॉटेल परिसर आदी ठिकाणी नाल्या तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत होते. यावर टीका झाल्यावर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी दुपारी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, बहुतांश स्वच्छता निरीक्षक व प्रभाग समिती क्रं-१ चे सहायक आयुक्त आदीजन उपस्थित होते.
शहरातील कलानी कॉलेज जवळील नाल्याची पाहणी करतांना, नाल्यास अडथळा ठरणाऱ्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या आदेशाने भूमाफियांचे दणाणले आहे. नालेसफाई नंतर, पाणी साठणाऱ्या ठिकाणांची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी करून स्वछता निरीक्षकांना सूचना केल्या आहेत.
शहरात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्याकरता महापालिका तत्पर असून सर्व प्रभाग समिती कार्यालय येथे रात्रपाळीत कर्मचाऱ्यांच्या टीमही नियुक्त केली. तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील तत्पर असून आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी माननीय आयुक्त यांनी दिलेल्या सूचनानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येणार असल्याची जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी सांगितले.
धोकादायक इमारतीकडे लक्ष?
धोकादायक इमारतींबाबतही सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी देण्यात आलेल्या आहेत. तसेच १० वर्ष जुन्या १३०० इमारती मधील नागरिकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत