उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून विसर्जन घाटांची पाहणी, घाटावर राहणार पोलीस बंदोबस्त
By सदानंद नाईक | Published: September 16, 2023 03:38 PM2023-09-16T15:38:06+5:302023-09-16T15:38:16+5:30
घाटावर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर व पोलीस बंदोबस्त राहण्याची माहिती दिली.
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील गणेश विसर्जन घाटांची पाहणी शनिवारी अधिकाऱ्यांसह करून संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. तसेच घाटावर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर व पोलीस बंदोबस्त राहण्याची माहिती दिली.
उल्हासनगर महापालिकेने पर्यावरण पूरक इको फ्रेन्डली गणेश उत्सवाची जनजागृती केली असून गणेश विसर्जनासाठी ६ कृत्रिम तलावाची निर्मिती केली. आयुक्त अजीज शेख यांनीं शनिवारी शहर अभियंता संदीप जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे. सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे यांच्यासह सेंच्युरी रेयॉन व आयडिया कंपनीजवळील उल्हास नदीवरील गणेश विसर्जन घाटाची पहाणी केली. यावेळी राहिलेल्या त्रुटीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे.
उल्हास नदी घाटाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, घाटाचे बांधकाम व विसर्जनास येणाऱ्या भाविकांसाठी रस्ताची दुरुस्ती, विधुत पुरवठा व लायटिंग, मुर्त्या उचलण्यासाठी लागणाऱ्या लोडिंग, अनलोडिंग मशीन, वाहतूकी कोंडी टाळण्यासाठी वाहनस्थळ, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस, यासह इतर सुखसुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन्ही नदी घाटावर उंच मूर्तीचे विसर्जन होणार आहे. तर लहान मूर्तीचे विसर्जन महापालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच घरगुती इको फ्रेंडली बाप्पाचे विसर्जन घरी स्वच्छ पाण्यात करण्याची जनजागृती महापालिकेने यापूर्वीच केली आहे.
आयुक्तांनी गणेशोत्सव दरम्यान सर्वांनी शांतता प्रस्थापित करावी, असेही आवाहन केले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आलेले असून त्यामधी टर्निंग पॉईन्ट येथील गोल मैदानकडे जाणारे रस्ते डांबरीकरणाने भरण्याच्या कामास सुरुवात केलेली आहे व सर्व रस्त्याची पहाणी प्रशासक तथा आयुक्त यांच्या मार्फत करण्यात आले आहे.