महापालिका हद्दीतील इमारतींवरील पत्रे, सौर उर्जेची पॅनल, बांधकामांसाठी असलेल्या टॉवर क्रेनची होणार तपासणी
By अजित मांडके | Published: June 25, 2024 03:22 PM2024-06-25T15:22:47+5:302024-06-25T15:23:19+5:30
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश.
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊजेर्ची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन या सर्व गोष्टींसाठी स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत. तसेच, वाºयाचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे यांचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यात प्रती तास वाºयाचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्याने घेण्यात यावी, असे निर्देशही आयुक्तांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.
शुक्रवारी रात्री गांवड बाग भागात लोखंडी पत्रा उडून झालेल्या दुर्घटनेत ६ मुले जखमी झाली होती. त्यानंतर याची दखल घेत आयुक्त राव यांनी महापालिकेच्या संबधीत विभागाची बैठक घेऊन हे निर्देश दिले आहेत.
३३ जाहिरात फलक काढून घ्यावेत
महापालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या ३३ फलकांचे त्यांच्या मालकांनी अजूनही आकारमान कमी केलेले नाही. याची गंभीर दखल आयुक्त राव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचे मनुष्यबळ लावून काढावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहीम हाती घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
त्या इमारतींवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू
वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले. त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुले जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल महापालिकेने घेतली आहे. संबंधित इमारतींने पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी, असे निर्देश राव यांनी वर्तकनगर सहायक आयुक्तांना दिले आहेत.
पावसाळी स्थिती आणि महापालिकेचे विविध विषय यांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी संध्याकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरी संशोधन केंद्र, माजिवडा येथे सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. त्यास, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
इमारतीवरील पत्रे खाली येण्याच्या घटना लक्षात घेवून पालिका क्षेत्रातील सर्व इमारतीवरील पत्रे (तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी वेदर शेड), सौर ऊर्जा पॅनल, मोबाईल टॉवर यांची पाहणी करणे आवश्यक झाले आहे. त्यांचे स्थिरता प्रमाणपत्र, परवानगी यांची तपासणी केली जावी. ही तपासणी करताना काय पहावे यांची एक आदर्श कार्यपद्धती मुख्यालयाकडून देण्यात येईल. त्यानुसार, ही पाहणी करावी, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत सांगितले.
अतिधोकादायक इमारतीबाबत दक्ष राहावे
अतिधोकादायक इमारती रिक्त करण्यात अनेक अडचणी येत असल्या तरी प्रत्येक इमारतीनिहाय स्वतंत्र उपाययोजना करून या इमारती रिक्त होतील हे सर्व सहायक आयुक्तांनी पहावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. नौपाडा आणि कोपरी भागातील २३ व्याप्त अतिधोकादायक इमारतींपैकी दौलत नगर येथील १४ इमारतींचा प्रश्न काही दिवसात मार्गी लागेल. तर, नवीन बांधकाम परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था केल्याने आणखी ०७ इमारतीतील नागरिक इमारत रिक्त करण्यास सहकार्य करतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. इतर प्रभागातील ०८ इमारती अती धोकादायक असून त्यांचीही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकतेनुसार, पाणी जोडणी तोडण्यात येईल. तसेच, वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण आणि टोरंट या कंपन्यांनाही लेखी कळविण्यात येणार आहे.
ज्या धोकादायक इमारतींचे मालक, रहिवासी स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यास तयार नसतील त्या धोकादायक इमारतींची वर्गवारी सी वनमध्ये करून त्यांना अंतिम इशारा नोटीस देवून त्या रिकाम्या कराव्यात. नागरिकांच्या जिविताच्या काळजीपोटी ही कारवाई करावी लागेल. वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाईही नोटीसांची मुदत संपताच सुरू करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.