पडघा उपकेंद्राची केंद्रीय सुरक्षा दलाकडून पाहणी; मुंबईसह पाच जिल्ह्यांना वीजपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:56 PM2024-01-10T13:56:43+5:302024-01-10T13:57:13+5:30
नेमकी पाहणी कशासाठी, माहित नसली तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज
मेघनाथ विशे, लोकमत न्यूज नेटवर्क, पडघा: बोरिवली गावातून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विद्युत उपकेंद्र पडघा याच परिसरात आहे. अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या या उपकेंद्राची नुकतीच दिल्लीतील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत पाहणी करण्यात आली. नेमकी ही पाहणी कशासाठी झाली, हे स्पष्ट झाले नसले तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज आहे.
या उपकेंद्रासाठी पडघा, वांद्रे, जुहूपाडा, भादाणे या गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. याच उपकेंद्रातून संपूर्ण ठाणे जिल्हा, गुजरातचा काही भाग, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, पालघर, रायगड, मुंबई, नवी मुंबई येथे वीजपुरवठा केला जातो. चंद्रपूर केंद्रात वीजनिर्मिती करून ती वाहिन्यांद्वारे पडघा उपकेंद्रात आणली जाते. येथे तिचे रूपांतर करून तिचा पुरवठा केला जातो. केवळ पडघाच नव्हे, तर कळवा, खारघर, लोणीकंद येथील छोट्या उपकेंद्रांचीही सुरक्षा दलाने पाहणी केली. सध्या येथे ठाणे ग्रामीण पोलिसांंबरोबरच भांडूप सुरक्षारक्षक मंडळाचे ५८ जवान तैनात आहेत. यातील बहुतांश सुरक्षारक्षक प्रकल्पग्रस्त, तसेच स्थानिक आहेत.
स्थानिक सुरक्षारक्षकांमध्ये अस्वस्थता
या केंद्रात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक, तसेच प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षक हवालदिल झाले आहेत. यामुळेच सुरक्षारक्षकांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात अधीक्षक अभियंता राम कोल्हे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
पडघा विद्युत उपकेंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त बळाला आमचा विरोध नाही. मात्र, यामुळे आमच्या नोकऱ्या धोक्यात येऊ नयेत, अशीच आमची मागणी आहे.
-बिरबल विशे, सुरक्षा पर्यवेक्षक
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून पडघा उपकेंद्राची पाहणी करण्यात आली. त्यांनी हे अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने याची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय दलाकडे असावी, असा अहवाल दिला आहे. मात्र, येथे वीस ते पंचवीस वर्षे सेवा करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर अन्याय न होता त्यांनी हे काम करावे.
- अनिल बाबर, सहायक सुरक्षा अधिकारी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून राज्यातील चार प्रमुख उपकेंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अन्य दलाकडे देण्यात यावी, या संदर्भात कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल सादर झालेला नाही.
- राम कोल्हे, अधीक्षक अभियंता