उल्हासनगर धोबीघाट परिसराची आयुक्तांकडून पाहणी, शेकडो नागरिकांना दिलासा
By सदानंद नाईक | Published: July 27, 2023 07:21 PM2023-07-27T19:21:28+5:302023-07-27T19:21:40+5:30
उल्हासनगर धोबीघाट शिवनगर परिसर टेकडी भागातील अनेक घरांना गेल्या वर्षी तडे गेल्याने, नागरिकांना नोटिसा देऊन सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.
उल्हासनगर : कॅम्प नं-१, धोबीघाट शिवनगर ब टेकडीच्या इर्शाळवाडी व माळीण होऊ देऊ नका, अशी साद स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे घातल्यावर, गुरवारी आयुक्त अजीज शेख यांनी भरपावसात अधिकाऱ्या समवेत परिसराची पाहणी करून, आयुक्तांनी धोकादायक टेकडीला संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन दिले. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.
उल्हासनगर धोबीघाट शिवनगर परिसर टेकडी भागातील अनेक घरांना गेल्या वर्षी तडे गेल्याने, नागरिकांना नोटिसा देऊन सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. तसेच टेकडी भागात सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्यात आली. यावर्षी संततधार पावसाने शिवनगर टेकडी परिसरात जमिनीला भेगा पडल्याचा आरोप नागरिकांनी केला. महापालिकेने बांधलेली भिंत अर्धवट असून शिवनगरचे माळीण व इर्शाळवाडी होऊ देऊ नका. अशी साद शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांनी महापालिका आयुक्ताकडे घातली. आयुक्त अजीज शेख यांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदीप जाधव, प्रभाग अधिकारी अनिल खतूरानी यांच्या समवेत गुरवारी दुपारी धोबीघाट शिवनगर परिसराची पाहणी केली.
महापालिकेने दरवर्षी प्रमाणे धोबीघाट शिवनगर टेकडी परिसरातील काही घरांना नोटिसा देऊन, सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले. स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिका आयुक्तांना साद घातल्यावर, महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना महापालिकेच्या तात्पुरता निवारा केंद्रात जाण्याची विनंती करण्यात आली. महापालिका प्रशासन याबाबत सतर्क असून धोकादायक टेकडी परिसराला संरक्षण भिंत बांधण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकारी यांना दिले. आयुक्तांच्या आश्वासनाने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांनी भरपावसात आयुक्तांनी अधिकाऱ्यां समवेत पाहणी केल्याने, नागरिकांना दिलासा मिळून महापालिका यंत्रणा कामाला लागल्याची प्रतिक्रिया दिली.