उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंडची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: December 23, 2022 05:16 PM2022-12-23T17:16:44+5:302022-12-23T17:17:17+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ होऊन धोकादायक झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर हलविले होते.
उल्हासनगर- कॅम्प नं-५ येथील ओव्हरफ्लॉ झालेल्या खडी खदान डम्पिंग ग्राऊंडची दुर्गंधी आणि आगीच्या धुराने हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मनसे शिष्टमंडळासह या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी केली. तसेच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ होऊन धोकादायक झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर हलविले. या डम्पिंग ग्राऊंडला स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी पहिल्या दिवसापासून विरोध केला. महापालिकेकडे डम्पिंगसाठी पर्यायी जागा नसल्याने, खडी खदान येथेच नावे डम्पिंग ग्राऊंड अस्तित्वात आले असून गेल्या ५ वर्षात डम्पिंग कचऱ्याने ओव्हरफ्लॉ झाले. तसेच डम्पिंगवरील प्लास्टिक पिशव्या, कागद, कपड्याच्या चिंध्यामुळे डम्पिंगला वारंवार आग लागून परिसरात धुराचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. या धुराने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हजारो नागरिकांनी धुराच्या त्रासाने येथून पलायन केले. तर घरातील एका नागरिकाला कोणता ना कोणता रोग जडल्याने बोलले जात आहे.
डम्पिंग ग्राऊंडच्या धुराने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डम्पिंग ग्राऊंड हलविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटने आंदोलन केले. तसेच मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर गुरवारी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह डम्पिंग ग्राऊंडला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उसाटने येथील डम्पिंगचा प्रश्न न्यायालयात गेला असून बदलापूर येथील सामूहिक डम्पिंग ग्राऊंड सुरू होण्याचे संकेत दिले. त्यानंतर शहरातून डम्पिंगचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे लेंगरेकर म्हणाले.