उल्हासनगरातील भुयारी गटारीच्या कामाची अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: March 13, 2024 08:53 PM2024-03-13T20:53:22+5:302024-03-13T20:53:35+5:30
शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारी कामाबाबत आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामाची पाहणी केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारी कामाबाबत आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामाची पाहणी केली. गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याचा आरोप यावेळी नागरिक दुकानदारांनी केला.
उल्हासनगरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत असून पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. सुरवातीला धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात सांगण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत आहेत. रस्ते खोदतांना रस्त्याखालील पाण्याचे पाईप तुटत असल्याने, लाखो लिटर पाणी खाली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक व नागरिक करीत आहेत. गटारीचे नवीन पाईप टाकल्यानंतर सिमेंटचे गटार चेंबर नव्याने बांधण्याची अट असल्याचे पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे सांगत असलेतरी, प्रत्यक्षात जुन्याच चेंबरची तात्पुरती दुरुस्ती करून तीच ठेवण्यात येत आहे. तसेच शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात गटारीचे पाईप अगदी लहान आकाराचे टाकल्याने, योजना फेल जाण्याचा आरोपही होत आहे.
शहरातून भुयारी गटार योजने बाबत तक्रारी सुरू झाल्याने, अखेर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कॅम्प नं-४ येथील कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यांनीही भुयारी गटारीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. गटारीचे पाईप टाकल्यानंतर खोदलेले रस्ते ठेकेदारांनी दुरुस्त करण्याची अट आहे. प्रत्यक्षात एकदा अपवाद सोडल्यास खोदलेले रस्ते दुरुस्ती विना असून शहरात धुळीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शहर पूर्वेत एकीकडे डम्पिंग वरील धुराचे साम्राज्य तर दुसरीकडे खोदलेल्या रस्त्याच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे.
सल्लागार गेला कुठे
शहरात राबविण्यात येत असलेल्या ४२६ कोटीच्या भुयारी गटार योजनेवर सल्लागार नेमण्यात आला. सल्लागाराला योजनेच्या एकून किंमतीच्या १ टक्के सल्ला शुल्क म्हणजे ४ कोटी देण्यात येणार आहे. योजनेबाबत नागरिकांत रोष वाढत असतांना सल्लागार कोणता सल्ला देतो. याबाबतही नागरिकांकडून टीका होत आहे.
कार्यकारी अभियंता हकालपट्टीची मागणी
महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांचे योजनेवर नियंत्रण नसल्याने, योजने बाबत नागरिकांत रोष वाढत आहेत. भविष्यात योजना पूर्ण होण्यासाठी कार्यकारी अभियंता बुडगे यांच्या हकालपट्टीची मागणी सर्वस्तरातून होत आहे.