गुटखा लाचखोरी नंतर नवघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देसाई नियंत्रण कक्षात उचलबांगडी
By धीरज परब | Published: March 31, 2023 08:52 PM2023-03-31T20:52:16+5:302023-03-31T20:52:23+5:30
गुटखा विक्रीसाठी १० हजारांच्या लाच प्रकरणी भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हवालदारास अटक झाल्या नंतर आता नवघर पोलीस ठाण्याचे
गुटखा विक्रीसाठी १० हजारांच्या लाच प्रकरणी भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हवालदारास अटक झाल्या नंतर आता नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांची उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात नेमले आहे.
२९ मार्च रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुटख्याची पूर्वी विक्री करणाऱ्या कडून गुटखा विकण्यासाठी १० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी हवालदार अमितकुमार पाटील व त्याचा पंटर अमित मिश्रा ह्या दोघांना अटक केली होती. हप्ते घेऊन सर्रास गुटखा विक्री करण्यास मोकळीक दिली जात असल्याची टीका पोलिसांवर होऊ लागली. तक्रारदाराच्या भावाने तर वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांचा देखील उल्लेख केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
देसाई हे अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. नवघर पोलिसात भ्रष्टाचार तसेच अन्यत्र विविध गुन्हे दाखल असलेले भाजपाचे माजी आमदार आरोपी नरेंद्र मेहता यांच्या सोबत देसाई यांनी पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा केला होता. त्यावरून देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठली. वरिष्ठांनी देसाई यांच्या वर प्रशासकीय कार्यवाही केली होती.
तर गुटखा लाच प्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी ३१ मार्च रोजी देसाई यांची उचलबांगडी करून पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात नियुक्ती केली आहे. काशीमीरा गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पवार यांच्यावर नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.