वाचन प्रेरणा दिन : वाचनच जगण्याला देते प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:02 AM2018-11-16T05:02:13+5:302018-11-16T05:02:50+5:30
वाचन प्रेरणा दिन : कळव्यातील जवाहर वाचनालयात झाला कार्यक्रम
ठाणे : ‘वेद आणि संत साहित्य ही भारतीय तत्त्वज्ञानाची, संस्कृतीची परंपरा आहे. गुरुशिष्य परंपरा आणि मौखिक साहित्यातून हजारो वर्षांपासून ही परंपरा रु जली आहे. त्यातून वाचनसंस्कृतीचा विकास झाला. हे वाचनच जगण्याला प्रेरणा देणारे ठरले आहे’, असे विचार कळवा येथील जवाहर वाचनालयाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या विशेष कार्यक्र मात मान्यवरांनी व्यक्त केले.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, समीक्षक अरविंद दोडे अध्यक्षस्थानी होते, तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय युवाशक्तीच्या प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. नेत्रतज्ज्ञ डॉ. शाहू रसाळ, कवी बाळ कांदळकर, साहित्यिक रामदास खरे उपस्थित होते. युवा कवयित्री जुई प्रधान यांच्या ‘अलवार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. वाचनालयाचे सचिव सुशांत दोडके व कार्यकारिणी सदस्या आशा मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर निशिकांत महांकाळ यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय भाषणात दोडे यांनी संत वाङ्मय, पाठांतर, संस्कारांचे महत्त्व, कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे कार्य, इंग्रजी भाषेतील साहित्याचा मराठीतील अनुवाद, वाचनाची आवड आपले विचार कसे समृद्ध करते, आदी विषयांवर भाष्य केले. प्रा. ठाणेकर यांनी युवाशक्तीच्या वाचन प्रेरणांविषयी मते मांडली. ‘वाचनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांना दोष न देता त्यांच्या पालकांनी पुस्तकांची आवड निर्माण करायला पाहिजे. मनोरंजन आणि बौद्धिक भूक भागवण्यासाठी वाचन किती महत्त्वाचे झाले आहे, याचा विचार झाला पाहिजे’, असे त्या म्हणाल्या. डॉ. शाहू रसाळ यांनी जुई प्रधान यांच्या काव्यसंग्रहाचे निरूपण केले. उपस्थित मान्यवरांनी ‘अलवार’ काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. साहित्यिक चांगदेव काळे, कवयित्री वैदेही केवटे, रंगकर्मी आदित्य संभुस, राजेंद्र ठाकूर, प्रतीक्षा बोर्डे, विनोद पितळे व इतर उपस्थित होते.