स्कॉटलंडमध्येही घुमला बाप्पाचा गजर, ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 11:18 PM2017-09-04T23:18:39+5:302017-09-05T11:10:24+5:30
अश्विनी भाटवडेकर ठाणे, दि. 4 - गणपती बाप्पा म्हटले की, सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण येते, त्यातही महाराष्ट्रीयन माणसाच्या तर विशेषच. मराठी ...
अश्विनी भाटवडेकर
ठाणे, दि. 4 - गणपती बाप्पा म्हटले की, सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण येते, त्यातही महाराष्ट्रीयन माणसाच्या तर विशेषच. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी गणेशोत्सव साजरा करताना आपले देहभानच हरपून जातो. याचाच प्रत्यय स्कॉटलंडमधील एडिनबरा शहरातही आला.
मराठा मित्र मंडळ एडिनबर (एमएमएम-ई) यांनी यंदा ३ दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - २०१७ (एसजीएफ - २०१७) साजरा केला. यासाठी मुंबईहून खास इकोफ्रेंडली गणेशाची मूर्ती मागवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गणेश स्थापना आणि पूजा फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आली आणि भारतातील सर्व प्रियजनांसह जगभरातील मित्र मंडळींना एडिनबरातील गणपतीचे दर्शन झाले.
तीन दिवसांच्या या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. शनिवारी संध्याकाळी ‘स्वरयात्रा’ या इंडोस्कॉटिश बँडच्या मदतीने स्थानिक भारतीय गायकांनी आणि कलाकारांनी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. गणरायाच्या साक्षीने सादर झालेल्या या भक्तिमय गीतांनी उपस्थितांना काही क्षण आपण महाराष्ट्रातच असल्याचा ‘फिल’ दिला. ‘एमएमएम-ई’ने यंदा सामाजिक बांधिलकीचा दाखला देणारा महत्वाचा टप्पा गाठला. ‘क्रांती’ या समूहाच्या ‘लालबत्ती एक्स्प्रेस’ लघुनाट्याला आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले. क्रांती संघटना मुंबईतील कामाठीपुरा वसाहतीत वाढणा-या मुलींना शिक्षण देण्याचे तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करण्याचे काम करते. मंडळाने या कार्यक्रमादरम्यान १,००० ब्रिटिश पौंड म्हणजे ८५,००० रुपये एवढा मदत निधी क्रांती संघटनेला मिळवून दिला.
गणपती विसर्जनाची मिरवणूक ही मराठी मंडळ एडिनबराची विशेष ओळख आहे. फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली. तेथून ती पोर्टबेलो या समुद्रकिना-यापर्यंत आणण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. ढोल -ताशाच्या गजरात आणि लेझिमच्या ठेक्यावर नाचत सगळ्यांनीच या मिरवणुकीचा आनंद लुटला. विसर्जनाची ही मिरवणूक जरी सातासमुद्रापार निघाली असली, तरी तिचा थाट मात्र, महाराष्ट्रातील मिरवणुकसारखाच होता. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्थानिक स्कॉटिश लोकही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एडिनबरा शहराचे माजी महापौर लॉर्ड प्रोहोस्ट व सध्याचे सांस्कृतिक समितीचे संयोजक डोनाल्ड विल्सन उपस्थित होते. या उत्सवासाठी कॉन्स्युलेट जनरल आॅफ इंडिया, यांचेही पाठबळ लाभले. कॉन्स्युलेट जनरल मंजू इंजन यांनी देखील गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशाचे दर्शन घेतले.
या तीन दिवसीय स्कॉटिश गणेश फेस्टिव्हलसाठी श्री. मीमा, गुच्ची(Guchhi) इंडिया, स्पाईस लॉज, कल्पना रेस्टॉरंट Amma’s spice & krishna foods या उद्योजकांनी हातभार लावला. सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मराठी मित्र मंडळ (एडिनबरा) च्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले कुटुंब व नोकरी सांभाळून दिवसरात्र मेहनत घेतली. यासाठी आयोजन समितीचे या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तीन दिवस कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. किरण साचणे, जितेंद्र पाटील, उमेश धामणकर, निलेश कणसे, सुजाता धामणकर, माधुरी बरगे, सौरभ सेठी, डॉ. किरण पटवर्धन, राजीव नाईक, अजय दीक्षित, धनंजय व पुजारी यांच्यासारख्या अनेक मराठी मित्रांनी परिश्रम घेतले.