फेरीवाल्यांकडून गोळा होतो दोन कोटींचा हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:20+5:302021-09-02T05:26:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला म्हणून व्यवसाय करणाऱ्यांकडून वर्षाकाठी किमान दोन कोटी रुपयांचा हप्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला म्हणून व्यवसाय करणाऱ्यांकडून वर्षाकाठी किमान दोन कोटी रुपयांचा हप्ता गोळा केला जातो. ही रक्कम स्थानिक राजकीय नेते, पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळेच थेट सहायक आयुक्तांवर चाकूने हल्ला करण्यापर्यंत फेरीवाल्यांची मुजोरी जाते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ठाणे हा शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गड असतानाही या शहरात किमान ७० टक्के फेरीवाले हे परप्रांतीय आहेत. मराठी माणसाच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला परप्रांतीयांनी कधी सर केला ते त्या पक्षाच्या नेत्यांनाही समजलेले नाही.
माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनधिकृतपणे बस्तान मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. फेरीवाल्यांना रस्ते व्यापून धंदा करण्याकरिता दररोज पैसे मोजावे लागतात. मूळ फेरीवाल्यांपैकी काहींनी आपल्या जागा परप्रांतीय फेरीवाल्यांना मासिक भाड्याने किंवा एकरकमी पैसे घेऊन दिल्या आहेत. वर्षाला तब्बल दोन कोटीपर्यंतचा हप्ता पोलीस, राजकीय मंडळी आणि पालिकेतील अधिकाऱ्यांना जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मराठमोळ्या ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या वाढत असून त्यांना राजश्रय दिला जात आहे.
अशी होते हप्ता वसुली
ठाणे स्टेशन परिसर, जांभळी नाका, वागळे, मुंब्रा, कळवा, उथळसर, घोडबंदर आदींसह शहराच्या मोक्याच्या ठिकाणी हे फेरीवाले बस्तान मांडून असतात. टोपली घेऊन भाजी विकणाऱ्या फेरीवाल्याकडून रोजच्या रोज २० रुपये हप्ता गोळा केला जातो. हातगाडीवर साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्याकडून ५० रुपये हप्ता वसूल केला जातो. कपडे विकणाऱ्या हातगाडीवाल्यांकडून १०० रुपये हप्ता घेतला जातो. या हप्त्याची वसुली करण्यासाठी फेरीवाल्यांपैकीच एक जण दलाल बनून इतर फेरीवाल्यांकडून पैसे गोळा करून रोजच्या रोज ही रक्कम पोलीस, पालिका अधिकारी आणि काही राजकीय मंडळींना पोहोचवली जाते. वार्षिक दोन कोटींचा हप्ता फेरीवाल्यांकडून दिला जात असल्याची धक्कादायक कबुली फेरीवाला संघटनाच्या सूत्रांनी दिली.
...........
वाचली