भार्इंदरऐवजी मीरारोड येथील राखीव भूखंडावर आगरी भवन बांधा; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 09:47 PM2018-03-08T21:47:11+5:302018-03-08T21:47:11+5:30
पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा
भार्इंदर : पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा, अश्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात गुरुवारी आयोजित बैठकीत पालिका आयुक्त बळीराम पवार यांना केली.
यावेळी मीरा-भाईंदरमधील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. पालिकेने शहर विकास आराखड्यानुसार आझादनगर येथील राखीव भूखंडावर सामाजिक वनीकरण व उद्यानाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकले आहे. त्याचा विकास पालिकेने अद्याप केलेला नाही. परिणामी त्या जागेवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अशातच त्यावर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व संग्रहालय साकारण्याचा प्रस्ताव गतवर्षीच्या महासभेत मंजुर करण्यात आला. या भूखंडाच्या एकुण ४६ हजार ७०० चौरस मीटर जागेपैकी ३५ हजार १८२ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा सत्ताधा-यांकडून तर ३० हजार ५३३ चौमी जागाच ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. एकुण जागेपैकी ४ हजार ५८० चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मात्र भाजपा सत्ताधा-यांनी त्यावर आगरी भवन निर्मितीच्या प्रस्तावाला २६ फेब्रुवारीच्या महासभेत मान्यता दिली. यामुळे एकाच आरक्षणावर तीन विकासकामे प्रस्तावित करण्यात आल्याने त्यांचा विकास प्रशासन राजकीय कुरघोडीतून कसा काय साधणार, असा प्रश्न सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. तत्पुर्वी ही विकासकामे साधण्यापूर्वी त्या भूखंडावरील आरक्षणात राज्य सरकारच्या मान्यतेने फेरबदल होणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव २९ जूलै २०११ रोजीच्या महासभेत मंजुर करण्यात येऊन राज्य सरकारकडे २८ मार्च २०१२ रोजी मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने अमान्य केल्याने या भूखंडाऐवजी मीरारोड येथील सर्व समावेशक आरक्षण क्रमांक २४६ वरील २ एकर जागेत आगरी भवनची निर्मिती करावी, अशी सुचना पालकमंत्र्यांनी आयोजित बैठकीत पालिका आयुक्तांना केली. या आरक्षणातील सुमारे ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने त्यावर आगरी भवन सहज साकारता येणार असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, आझादनगर येथील उपलब्ध जागेच्या १५ टक्के जागेवरच स्मारक बांधकामाची परवागनी असताना त्याच जागेवर आगरी भवन बांधण्याचा भाजपा सत्ताधा-यांचा अट्टहास त्या समाजाची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप आ. प्रताप सरनाईक यांनी केला आहे. त्याची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी थेट पालकमंत्र्यांनाच साकडे घातल्याने गुरुवारी पालकमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. तसेच स्थानिक नगरसेविका नीलम ढवण यांच्या प्रयत्नाने भार्इंदर पुर्वेलाच सुरु असलेले मार्केटचे काम काही राजकीय मंडळीमार्फत थांबविण्याचा प्रयत्न होत असल्याने ते काम न थांबविण्याच्या सूचना देखील आयुक्तांना करण्यात आल्या. बैठकीत आ. सरनाईक यांच्यासह पालिका आयुक्त, शहरअभियंता शिवाजी बारकुंड, नगररचनाकार हेमंत ठाकूर, सह नगररचनाकार केशव शिंदे, उपअभियंता नितीन मुकणे, कनिष्ठ अभियंता, श्रीकृष्ण मोहिते आदी उपस्थित होते.