धान्याऐवजी बँक खात्यात रक्कम जमा करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:38 AM2018-10-25T00:38:16+5:302018-10-25T00:38:23+5:30
रेशनिंग दुकानांव्दारे मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य पुरवठ्यासह रॉकेलचा पुरवठा शिधापत्रिकाधारकाना होत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : रेशनिंग दुकानांव्दारे मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य पुरवठ्यासह रॉकेलचा पुरवठा शिधापत्रिकाधारकाना होत आहे. पण या ऐवजी या धान्यांसह रॉकेलच्या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत काही ठिकाणी डीबीटीव्दारे रक्कम बँकेत जमा करण्यासाठी सहमती घेतली जात आहे. ती लवकरच ठाणेसह अन्य ठिकाणी लागू होईल, या भीतीपोटी डीबीटीला विरोध करण्यासाठी श्रमजीवी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
कॅश ट्रान्स्पर आॅफ फूड सबसिडी रूल- २०१५ हा केंद्र शासनाचा अद्यादेश आहे. यास अनुसरून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्पाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने अद्यादेश जारी केला आह. यानुसार मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातीलआझाद मैदान व महालक्ष्मी आदी ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानांवर या अद्यादेशाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर रावण्याचे सूचित केले आहे. पण ठाणे जिल्ह्यात कोठेही डीबीटी प्रकल्पाचा प्रयोग सुरू नसल्याचे सुतोवाच जिल्हापुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांनी सांगितले. पण सध्यातील हा डीबीटी प्रायोगिक प्रकल्प लवकरच सर्वत्र राबवण्याची भीती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करून त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा प्रवित्रा घेतला आहे.
सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू असून लाभार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये डीबीटी कॅश हा पर्याय निवडल्यास शिधापत्रिकाधारकास तांदूळ व गहू या धान्याची रक्कम बँक खात्यात जमा होत आहे. लाभार्थ्यांस प्रति किलो तांदूळासाठी २६.६६ तर गव्हासाठी १९.३९ रूपये दोन्ही मिळूून ४६.३५ रूपये अनुदान बँक खात्यात जमा होते.
।अत्योदयकार्डधारकाच्या खात्यात ८०७ रूपये
या डीबीटीव्दारे मध्ये अंत्योदयच्या लाभार्थी कुटुंबास सुमारे १७ किलो तांदूळ व १८ किलो गहू आदी ३५ किलो धान्याचा लाभ होत आहे. यासाठी सुमारे ८०७.६४ रूपये अनुदानाची रक्कम संबंधीत अंत्योदय लाभार्थी शिधापत्रिकाधारकाच्या खात्यात जमा होणार आहे. याशिवाय संबंधीत दुकानदाराला त्यापोटी मिळणारे ५२.५० रूपये कमिशन मिळणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांप्रमाणे प्राधान्य कुटूंबाच्या लाभार्थ्यांस दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मिळतात. त्यांची ११२.३९ रूपये अनुदान बँक खात्यात जमा केले जाते. पण ही डीबीटी प्रकल्पच नको, गोरगरीब जनतेला त्यापासून अन्नधान्य मिळणार नाही, त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर त्याविरोधात आंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात आहेत.