'बियरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा, रक्ताच्या बाटल्या भरूया'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 06:39 PM2020-12-31T18:39:58+5:302020-12-31T18:57:06+5:30
सानेगुरुजी समाजसेवी शिक्षक संघाचा उपक्रम ;
नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ३१ ) राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा पडत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सानेगुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्यावतीने भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हॉल येथे 'बियरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा, रक्ताच्या बाटल्या भरूया' असा सामाजिक संदेश देत गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडल अध्यक्ष प्रकाश पाटिल, भिवंडी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव, आमणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम दळवी, सानेगुरूजी समाजसेवी शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी पडघा व परिसरातील ६७ नागरीकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. ३१ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या साने गुरुजी शिक्षक संघाचे यावेळी पडघा परिसराच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी सानेगुरुजी समाजसेवी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत भोसले, कार्याध्यक्ष संतोष जोशी,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काठे, सचिव अशोक ठाणगे,संघटक गणेश गायकवाड, खजिनदार विकास पाटकर , संघटक रविंद जाधव, प्रशांत घागस तर आदी उपस्थित होते. सानेगुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्यावतीने रक्तदान शिबिराचे यंदाचे विसावे वर्ष होते.रक्त दात्यांना आमंत्रणाची गरज नसते, तर ते स्वतः आपोआप येऊन आपले रक्तदान करीत असतात. देणगी दात्यांमुळे कार्यक्रम उभा राहतो तर ,रक्त दात्यांमुळे कार्यक्रम यशस्वी होतो. असे सानेगुरूजी समाजसेवी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत भोसले यांनी बोलताना सांगितले.