हक्काची निवड श्रेणी देण्याऐवजी ८२ वर्षीय वृद्ध शिक्षक पत्नीची मीरा भाईंदर महापालिकेकडून फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 08:52 PM2020-12-10T20:52:06+5:302020-12-10T20:52:17+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याकाळी शिक्षक म्हणून नागनाथ दामोदरे हे शिकवत असत.
मीरारोड - मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत निवृत्त झालेल्या शिक्षकास त्याच्या मृत्यू नंतर ८ वर्ष उलटली तरी मीरा भाईंदर महापालिके कडून हक्काची निवडश्रेणी दिली गेली नाही . त्या शिक्षकाच्या मृत्यू नंतर ८२ वर्षांच्या वृद्ध शिक्षक पत्नी गेल्या ८ वर्षां पासून वारसा हक्का नुसार निवडश्रेणी मिळावी म्हणून महापालिकेचे उंबरठे व्हीलचेअर वरून झिजवत आहेत .
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याकाळी शिक्षक म्हणून नागनाथ दामोदरे हे शिकवत असत. नंतर जिल्हापरिषदेच्या शाळा ह्या त्यावेळच्या मीरा भाईंदर नगर परिषदे कडे वर्ग झाल्याने दामोदरे यांची सेवा सुद्धा पालिकेत वर्ग झाली. मुख्याध्यापक पदावरून ते १ एप्रिल १९९४ रोजी सेवानिवृत्त झाले . एक महिना सहा दिवस पालिकेचे कर्मचारी म्हणून काम केले. १ जानेवारी १९८६ पासून एकूण सेवा २९ वर्षे आठ महिने इतकी झाली असल्याने निवडश्रेणीचा लाभ त्यांना मिळायला हवा होता.
सप्टेंबर २०१२ मध्ये दामोदरे यांचा मृत्यू झाला . त्यांच्या पत्नी शांता ह्यांनी कौटुंबिक वेतनासह निवडःश्रेणी मिळावी म्हणून २०१२ साली महापालिकेच्या शिक्षण विभागात अर्ज केला होता . त्यांचे कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्यास सुद्धा विलंब केला आणि जे दिले ते देखील कमी रकमेचे दिले गेले.
गेल्या ८ वर्षां पासून शांता ह्या त्यांचा नातू सागर ह्याच्या आधारे हक्काची निवड श्रेणी आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनातील कमी दिलेली रक्कम मिळावी म्हणून महापालिकेसह शिक्षण विभागा कडे पत्र व्यवहार करत आहेत . परंतु आज वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ह्या शिक्षक पत्नीस अजूनही पतीच्या हक्काचा मोबदला पालिकेने दिलेला नाही .
चालत येत नाही तरी त्या उल्हासनगर वरून येतात . व्हीलचेअरवरून त्या महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत . परंतु अनु निवृत्त शिक्षकां प्रमाणेच पालिकेच्या शिक्षण विभागाने निवडश्रेणीचा लाभ देण्यास गंभीर अशी कसूर चालवली आहे . माहिती अधिकारात देखील त्यांना पालिके कडून आजही निवडश्रेणीची कार्यवाही प्रस्तावित आहे असे निगरगट्ट ठोकळेबाज उत्तर शिक्षण अधिकाऱ्या कडून दिले जात आहे .