खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी जनरल डायरप्रमाणे आम्हाला गोळ्या घालाव्यात, आनंद परांजपेंचं पोलीस आयुक्तांना आव्हान
By अजित मांडके | Published: March 4, 2023 06:07 PM2023-03-04T18:07:54+5:302023-03-04T18:08:03+5:30
"आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला."
ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणार्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातील भादंवि ३०७ हे गंभीर कलम संशयास्पद आहे, असे निरीक्षण ठाणे सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. ठाणे पोलिसांकडून वारंवार असे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने गुन्हे दाखल करणारे पोलीस आयुक्तलय आम्हाला जनरल डायर असल्यासारखेच वाटत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पोलीस मैदानात बोलवावे अन् थेट गोळ्या घालाव्यात. आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.
परांजपे म्हणाले की, डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनाचा निर्णय देताना न्यायालयाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील विविध पाच खटल्यांचा आधार घेतला. तसेच आपले निरीक्षण नोंदविताना, केवळ तक्रारदार सांगतो म्हणून हल्ला करणार्यांच्या हातात हत्यारे होती, असे होत नाही. आव्हाड यांनी महेश आहेर यांच्याविरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानेच तक्रारदाराने आव्हाड यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले आहे. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या एकाही चित्रणामध्ये कोणतेही शस्र दिसत नाही. ही मारहाण हात आणि बुक्क्यानी झाल्याचे दिसत आहे. कोणतेही शस्त्र वापरलेले नसल्याने ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने दाखल केलेला भादंवि ३०७ हा कलम संशयास्पद आहे, असे नमूद केले आहे.
ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता लवकरच ठाणे पोलिसांच्या विरोधात ठाणेकर ‘जनद्रोह’ करतील. आपणाला कधी-कधी पोलीस आयुक्त जयजित सिंह हे जनरल डायर असल्यासारखे वाटते असेही परांजपे म्हणाले.
या प्रकारामागे कोण आहे, असे विचारले असता, ‘खोटे गुन्हे दाखल करण्यात ठाणे पोलीस आघाडीवर आहेत. पोलीस आयुक्तांचे सहकारी उगले हेदेखील या कामात पुढाकार घेत आहेत. हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दबावाखालीच होत आहे. त्यांच्या थेट इशार्यावरच हे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असेही परांजपे म्हणाले.