आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेच्या विकासाची कामे करा - प्रताप सरनाईक
By अजित मांडके | Published: October 27, 2023 07:06 PM2023-10-27T19:06:15+5:302023-10-27T19:08:42+5:30
ड्रग्ज प्रकरणावरुन ठाण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
ठाणे : ड्रग्ज प्रकरणावरुन ठाण्यात दोनही राष्ट्रवादीकडून एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. परंतु आरोप प्रत्यारोपांमध्ये जाण्यापेक्षा ज्या लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. त्यांच्या विकास कामांसाठी आपला वेळ अधिक खर्ची केला तर लोक सुद्धा समाधानी होतील असा सल्ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीच्या दोनही गटांना दिला आहे.
ड्रग्ज प्रकरणावरुन ठाण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात आता सरनाईक यांनी देखील उडी घेतली आहे. शुक्रवारी ठाणे महापालिकेत त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा सल्ला दिला आहे. कोणाचा तरी कोणाबरोबर फोटो प्रसिद्ध करीत आहे. तिकडून उलट आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यापेक्षा विकास कामांना महत्व द्या असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत एका गुन्हेगाराचा फोटो ट्विट केला, त्यावर सरनाईक यांना छेडले असता, मुख्यमंत्री हे कोण कोणाचा पथांचा आहे, कुठल्या जातीचा आहे, हे पाहत नाही. त्यामुळे भेटलेली जी व्यक्ती आहे, तो काही गुन्हेगारी स्वरुपाचा वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारे फोटो ट्विट करुन केवळ पब्लिसीटी स्टंट करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
दसऱ्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेत माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असेल असे वचन दिलेले आहे. त्यामुळे थोडीशी वेळ मराठा समाजाने बांधवांनी सरकारला द्यावी अशी विंनतीही त्यांनी केली.