ठाणेकरांच्या समस्या सोडविण्याऐवजी शिवसेना-भाजप गुंतली मतांच्या राजकारणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:44 AM2021-08-25T04:44:50+5:302021-08-25T04:44:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे सरकारी कंपन्या, उद्याेगांचे खासगीकरण केले जात आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे सरकारी कंपन्या, उद्याेगांचे खासगीकरण केले जात आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. या समस्या सोडविण्याऐवजी शिवसेना आणि भाजप सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतांच्या राजकारणात गुंतल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात तर वाहतूककोंडीची समस्या आ वासून उभी आहे. कचराकोंडी खड्डे, पार्किंग, पाणीटंचाई आणि आरोग्याची समस्या असताना त्यावर काही करता येईल का? यावर विचार करण्याऐवजी केवळ मतांंसाठी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आपली झोळी भरण्याचाच प्रयत्न करीत असल्याची कठोर टीका शिवसेना-भाजपमधील सध्याच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
ठाण्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेनेचा खटाटोप सुरू असताना मंगळवारी शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोंबडी चोर बोलून आंदोलन केले. तर भाजपनेदेखील आम्ही देखील जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला. परंतु, सर्वसामान्य जनतेला हे हवे आहे का? तर याचे उत्तर दोन्ही पक्षांकडे नाही.
कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’
ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजही सत्ताधाऱ्यांना किंवा महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राऊंड मिळविता आलेले नाही. किंबहुना आजही शहरातील कचऱ्याची समस्या सोडविता आलेली नाही. शहरात रोज एक हजार मेट्रिक टन कचरा तयार होत असतांना त्याचे व्यवस्थापन आजही शिवसेना किंवा विरोधी पक्ष म्हणून मिरविणाऱ्या भाजपलादेखील करता आलेले नाही.
वाहतूककोंडी पाचवीलाच
ठाण्याची लोकसंख्या वाढत असतांना वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते भले मोठे झाले असले तरीदेखील अद्यापही वाहतूककोंडीची समस्या सोडविता आलेली नाही. ती जणू ठाणेकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.