एसटीपेक्षा दीडपट भाडे आकारण्याच्या खासगी बसचालकांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:43+5:302021-09-07T04:48:43+5:30
ठाणे : अव्वाच्या सव्वा भाडे उकळणाऱ्या खासगी बसचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार एसटी ...
ठाणे : अव्वाच्या सव्वा भाडे उकळणाऱ्या खासगी बसचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार एसटी बसच्या प्रति किलोमीटर भाड्यापेक्षा दीडपटीपेक्षा कमी भाडे आकारण्याची सूचना केली आहे. ज्या ठिकाणाहून खाजगी बस सुटणार आहे त्या ठिकाणी आसनानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी दरफलक लावण्याचे विभागाने खाजगी बसमालकांना सांगितले आहे. त्यामुळे जादा दरभाडे आकारणाऱ्यांना चाप बसणार आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची संधी चाकरमान्यांना मिळाली नव्हती. परंतु, यंदा मात्र तीन महिने आधीपासूनच त्यांनी कोकणात जाण्याची तयारी केली आहे. रेल्वे, एसटी तसेच खाजगी बसच्या माध्यमातून ते कोकणात निघाले आहेत. परंतु, कोरोनाच्या नावाखाली खाजगी बस मालकांकडून प्रवाशांची लूट होण्याची दाट शक्यता आहे. तसे होऊ नये म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने हा आदेश जारी केला आहे. मनमानी भाडे आकारून खाजगी बसचालक प्रवाशांना मेटाकुटीस आणत असल्याचा तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाला मिळाल्या होत्या. त्यानुसार विभागाने एका आदेशाद्वारे खाजगी वाहतूकदारांनी उत्सवानिमित्त जाणाऱ्या खाजगी बसच्या प्रत्येक आसनाच्या किलोमीटरनुसार दरफलक लावण्याचा सूचना केल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. ज्या ठिकाणाहून खाजगी वाहन सुटणार आहे, त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी आसनानुसार दरफलक लावणे अत्यावश्यक आहे. जर खाजगी वाहन नियमापेक्षा जास्त आकारणी करीत असल्यास त्याची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.