पाणी साचले तर दोरखंड धरण्याची सूचना; मात्र त्या दोरखंडाचा पत्याच नाही
By अजित मांडके | Published: July 2, 2024 03:24 PM2024-07-02T15:24:41+5:302024-07-02T15:25:20+5:30
पावसाळा सुरु झाला की महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शहरात पाणी तुंबणाºया ठिकाणांची यादी जाहीर केली जाते.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत यंदा ३३ ठिकाणी पाणी साचणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्याची यादी देखील जाहीर केली आहे. तसेच जी महत्वाची १४ ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी अधिक स्वरुपात पाणी तुंबते अशा ठिकाणी महापालिकेने फलक लावले असून काय काय काळजी घ्यावी याची माहिती त्यावर दिली आहे. परंतु त्यातील शेवटची ओळ खुप महत्वाची असून अधिकचे पाणी साचल्यास नजीकच्या दोरखंडाचा वापर करुन मार्गक्रमण करावे असे त्यावर लिहिले आहे. मात्र दोरखंडाचा त्याठिकाणी पत्ताच नसल्याचे प्रत्यक्षात दिसत आहे.
पावसाळा सुरु झाला की महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शहरात पाणी तुंबणाºया ठिकाणांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार मागील वर्षी पर्यंत ही ठिकाणे केवळ १४ एवढीच होती. परंतु यंदा मात्र त्यात वाढ होऊन ही संख्या ३३ वर गेली आहे. त्यानुसार प्रभाग समिति निहाय विचार करता सर्वधिक पाणी साठण्याची ठिकाणे दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत १६ आहेत. तर त्यापाठोपाठ नोपाडा -कोपरी -८ उथळसर -०३, माजिवडा-मानपाडा -०४ कळवा -०२ आदिचा समावेश आहे.
त्यातील राम मारुती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटीस पुलाखालील मासुंदा तलाव वंदना टॉकीज ,गायमुख हायवे ,विटावा रेल्वे पूला खाली,शिवाजी नगर, दादलानी पार्क, पेढ्या मारुती रोड, साबे गाव, डायघर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक, चव्हाण चाळ, वृदांवन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक घोडबंदर रोड, आदी काही ठिकाणे ही महत्वाची पाणी तुंबणारी ठिकाणे असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. त्यानुसार पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबणार आहे, त्याठिकाणी महापालिकेने फलक लावले आहेत. या फलकावर धोक्याची सुचना असे लिहिण्यात आले आहे. त्या खाली अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. कृपया सदर ठिकाणी येण्याचे टाळावे किंवा नजीकच्या दोरखंडाचा वापर करुन मार्गक्रमण करावे असे देखील लिहिले आहे.परंतु सध्या तरी येथील कोणत्याही ठिकाणी दोरखंडाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठा पाऊस झालाच आणि या ठिकाणांवर पाणी साचले तर नजीकच्या कोणत्या ठिकाणी दोरखंड शोधायचा असा सवाल या निमित्ताने ठाणेकरांनी उपस्थित केला आहे.