चारचाकी लावण्यासाठी जागा अपुऱ्या; वाहनसंख्या झाली डाेकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:50 PM2021-02-20T23:50:25+5:302021-02-20T23:52:12+5:30
घर, दुकान, सेवा रस्त्यांवर पार्किंग : वाहनसंख्या झाली डाेकेदुखी
अजित मांडके
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. दुचाकींबरोबर चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची समस्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. इमारतींच्या ठिकाणीदेखील पार्किंग मुबलक प्रमाणात नसल्याने अनेक वाहनचालकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र ठाण्यात आहे.
घोडबंदर भागातील सेवा रस्ता हा तर अडचणीचा ठरत आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती भागातील राम मारुती रोड, गोखल रोड, खोपट आदींसह इतर काही महत्वांच्या रस्त्यांवर अशाप्रकारे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळून अपघातांची भीती व्यक्त होत आहे.ठाणे शहरात वर्षागणिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी नवनवी गृहसंकुले उभी राहत असल्याने त्याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांमुळेदेखील वाहनांच्या संख्येत भर पडत आहे.
आज शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे, तर वाहनांची संख्या ही जवळपास लोकसंख्येच्या आसपास पोहोचली आहे. शहरात आजघडीला २२ लाख १७ हजार ६९९ वाहने रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये सर्वाधिक १२ लाख ८२ हजार ६९९ दुचाकींची संख्या आहे, तर चार लाख ४९ हजार ७०७ एवढ्या चारचाकी आहेत. त्यामुळे रस्तेदेखील अपुरे पडू लागले आहेत.
इमारतींमध्येही वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने अनेक ठिकाणी इमारतींच्या बाहेरील रस्त्यांवर वाहने लागलेली दिसतात. शहरातील हिरानंदानी इस्टेट गृहसंकुल असेल किंवा ब्रम्हांड व इतर मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील हीच समस्या आहे. वाहन रस्त्यांवर पार्क झाल्यानंतर वाहतूक शाखेकडून कारवाई होत आहे.