शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांचा अपमान? माजी सैनिकांना शेवटच्या रांगेत स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 12:32 AM2019-08-18T00:32:10+5:302019-08-18T00:32:25+5:30
कार्यक्रमात एका हिंदी कवयित्रीने कवितेमध्ये शहीद पत्नी आणि मुलाबाबत केलेल्या वर्णनावरून नातलग संतप्त झाले. त्यांनी ही कविता ताबडतोब थांबवण्यास सांगितले.
मीरा रोड : मीरा रोड रेल्वेस्थानकाबाहेर शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या वीर स्मृती स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेतून राणे कुटुंबीयांचा अवमान झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या कवितेला राणे कुटुंबीयांनी भरकार्यक्रमात आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला होता. तसेच माजी सैनिकांना व्यासपीठावर न बोलवता शेवटच्या रांगांमध्ये बसवून अपमानास्पद वागणूक दिल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
७ आॅगस्ट २०१८ रोजी काश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यांना कंठस्नान घालत असताना मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. तेव्हा कौस्तुभ यांचे आमदार निधीतून स्मारक उभारण्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले होते. महापालिकेद्वारे मीरा रोड रेल्वेस्थानकाबाहेर वीर स्मृती स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचे अनावरण स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आई ज्योती, वडील प्रकाश राणे आणि पत्नी कनिका यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौर डिम्पल मेहता, आमदार मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती अॅड. रवी व्यास, सभागृहनेते रोहिदास पाटील, पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी व भोसले यांच्यासह नगरसेवक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महापालिकेचा कार्यक्रम असताना अनेक मीरा रोड परिसरातील नगरसेवकांना तसेच माजी सैनिकांना खाली बसवले होते. तर, पालिकेचे लाखो रुपये थकवणाऱ्या भाजपच्या पदाधिकाºयाला व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान दिले होते. तर, माजी सैनिकांना व्यासपीठावर सोडाच, पण मागच्या रांगेमध्ये स्थान दिल्याने सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे स्मारकास अभिवादन करून ते कार्यक्रमातून निघून गेले. माजी सैनिकांनीही देशसेवा प्राणाची पर्वा न करता बजावली असून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी खटाटोप करताना माजी सैनिकांना अपमानास्पद वागवल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.
कार्यक्रमात एका हिंदी कवयित्रीने कवितेमध्ये शहीद पत्नी आणि मुलाबाबत केलेल्या वर्णनावरून नातलग संतप्त झाले. त्यांनी ही कविता ताबडतोब थांबवण्यास सांगितले. या अचानक उद्भवलेल्या प्रसंगानंतर सर्वच स्तब्ध झाले. अखेर, आमदार मेहता यांनी या प्रकाराबाबत माफी मागून कवितेमागची भावना कुणाला दुखवायची नव्हती, पुढचे कडवे ऐकाल तर सर्व स्पष्ट होईल, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मेहता म्हणाले की, आमदार निधीतून मेजर राणे यांचे भव्य स्मारक उभारले आहे. या स्मारकामुळे शहरवासीयांना देशसेवेची नेहमी प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले. मुलामुळेच आम्हाला आज सन्मान मिळत आहे. त्याने आम्हा कुटुंबाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे ज्योती राणे म्हणाल्या. कौस्तुभचा स्वभाव निडर होता. देशप्रेमामुळे सर्वोच्च बलिदान काय असते, हे त्याने दाखवून दिले. देशसेवेसाठी विधायक आणि खरे कार्य करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
स्मारकाचा नामफलक अमराठी भाषेत
मराठी एकीकरणचे प्रदीप सामंत, गोवर्धन देशमुख, सचिन घरत यांनी शहिदांबद्दलची ही कणव म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका केली आहे. मेजर राणे शहीद झाले, त्या दिवशी सायंकाळी आ. मेहता हे महापौर, उपमहापौर व भाजपचे नगरसेवकांसह एका बर्थडे पार्टीत जल्लोष करत होते. शासनाकडून दिली जाणारी सन्मान रक्कमही आपण मिळवून दिल्याचे श्रेय घेण्याचा निंदनीय प्रयत्नही त्यांनी केला होता. हे सर्व लोक विसरलेले नाहीत. मराठी राजभाषा असूनही स्मारकाचा नामफलक अमराठी भाषेत तसेच कार्यक्रमात अमराठी भाषेचा वापर करणे मराठी भाषेचा अपमानच नव्हे तर भाषाद्रोहच असल्याने आयुक्तांसह संंबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.
माझ्या मुलासाठी मीच आई आणि बाबा आहे. त्याला त्याच्या बाबाची उणीव जाणवू देणार नाही. पती शहीद झालेल्या घटनेकडे आमचे कुटुंब निराशेच्या दृष्टीने पाहत नाही. कौस्तुभ खरा हीरो होता. त्यामुळे अशी स्मारके झाली पाहिजेत. मुले-तरुणांसाठी हे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल.
- कनिका राणे, वीरपत्नी