विमा कंपनी बळीराजाला लूटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:50 PM2018-10-30T22:50:11+5:302018-10-30T22:50:30+5:30

कापणी सुरू झाली तरी पंचनामे नाही; महसूल, कृषी खात्याची साथ; भरपाई मिळणार कशी

Insurance company looted Biliraja | विमा कंपनी बळीराजाला लूटणार

विमा कंपनी बळीराजाला लूटणार

- हितेन नाईक

पालघर : शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने करपून गेलेल्या भातशेतीचे पंचनामे आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तातडीने न केल्याने व कृषी आणि महसूल खातेही याबाबत निष्क्रिय असल्याने विमा उतरवूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. कारण शेतकºयांनी भाताची कापणी सुरू केली आहे. कापणी केल्यानंतर वाया गेलेल्या पिकाचे पंचनामे होऊ शकणार नाहीत. आणि शेतकºयांना भरपाईही मिळू शकणार नाही. यातून विमा कंपनीचा करोडोंचा फायदा होईल. तर शेतकरी भरपाई मिळण्यास पात्र असूनही ती पासून वंचित राहतील. वास्तविक कृषी आणि महसूल खात्याने पिक करपताच विमा कंपनीला जागे करून या पिकांचे पंचनामे करणे आवश्यक होते. परंतु त्यांचीही मिलीजुली असल्याने ते निष्क्रिय राहीले त्यामुळे विमा उतरवून व त्याचे हप्ते भरूनही बळीराजा भरपाईपासून वंचित राहीला. तर विमा कंपनीचा कोट्यवधीचा फायदा झाला.

जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडी खाली येत असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात ७५ हजार ०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची पुनर्लागवड करण्यात आल्याचे कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ह्यावर्षी जूनमध्ये ५२४.२ मिमी, जुलैमध्ये १५१९.४ मिमी, आॅगस्टमध्ये ३५२.२ मिमी, सप्टेंबरमध्ये ३९.९ मिमी असा एकूण २३१४.६ मिमी पाऊस झाला. जून महिन्यात लावलेली भातशेती चांगल्या पावसामुळे बहरली असतांना अचानक शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने पाण्या अभावी संपूर्ण हळवी व गरवी पिके करपून गेली.

शेतकºयांनी खरीप हंगामासाठी सहकारी बँके कडून कर्ज घेतले. भात शेती करपल्याने हातात काहीच उत्पन्न पडणार नसल्याने या कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर आ वासून उभा राहिला आहे. जिल्हाधिकाºयांनी विमा कंपनी सोबत बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण करण्यात आले नसल्याचे पालघर तालुका कृषी विकास सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी ह्यांनी लोकमतला सांगितले.

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या नॅशनल सेंटर फोर क्रॉप फॉरकास्टिंग संस्थे कडून गावातील पाण्याची सद्यस्थिती,पाण्याची पातळी,पिकाची परिस्थिती आदीचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून पालघर, तलासरी, विक्रमगड तालुक्यांना टंचाई सदृश्य गावे घोषित करण्यात आली होती.
अशा १० टक्के गावांची पाहणी समितीने करून अहवाल पाठविल्या नंतर ही गावे दुष्काळ सदृश्य जाहीर केली आहेत. अशा जाहीर
केलेल्या गावांपैकी दांडी, नानिवली, सरावली, काटाळे, कोळगाव, दापोली आदी भागात भातशेतीची अत्यल्प प्रमाण असतानाही
त्यांचा समावेश करण्यात आल्याने उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा,तालुक्यातील सर्व गावामध्ये पीक पाहणी करून पंचनामे करावेत,अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

कापणीनंतर पंचनामे होणार तरी कसे?
पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स लिमिटेड कंपनीने शेतकर्यांचे पिकविमे उतरविले असून ह्या टंचाईग्रस्त सदृश्य परिस्थिती नंतर तात्काळ पीक पाहणी करून पंचनामे करणे आवश्यक होते.
मात्र अजूनही या कंपनीने पंचनामे सुरू केलेले नाहीत. काही शेतकºयांनी कापणीलाही सुरुवात केल्याने अशा शेतकºयांना भरपाईपासून वंचित राहण्याची पाळी उद्भवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Insurance company looted Biliraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.