दिवा परिसराचा एकात्मिक विकास, महासभेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:39 AM2018-10-25T00:39:33+5:302018-10-25T00:39:37+5:30

दिव्याचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे.

 Integrated development of Diva area, alliance of Mahasabha | दिवा परिसराचा एकात्मिक विकास, महासभेची मंजुरी

दिवा परिसराचा एकात्मिक विकास, महासभेची मंजुरी

Next

ठाणे : दिव्याचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, दिव्यातील डायघरसह खिडकाळी, पडले, देसाई व सांगर्ली या गावांचा या माध्यमातून विकास केला जाणार आहे. यामध्ये रस्ते, दिवाबत्ती, पाणी, उद्यान, खेळाचे मैदान विकसित करणे, दवाखाने, रुग्णालयांसह शाळा बांधण्यात येणार आहेत. याशिवाय, इतर मूलभूत सोयीसुविधांचा समावेश आहे. यासाठी १४ कोटी ९२ लाखांचा खर्च अपेक्षित धरला असून यासंदर्भातील प्रस्ताव महासभेने नुकताच मंजूर केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समितीअंतर्गत बहुतांश भाग हा ग्रामीण आहे. या भागाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन येथील विकास करणे गरजेचे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार, या भागातील गावांचा विकास करण्यासाठी पालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार असताना सद्य:स्थितीत ताब्यात असलेले मोकळे आरक्षण, सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या सुविधा या बाबींचा विचार केला आहे.
>असा होणार विकास
नव्याने प्रभाग कार्यालय बांधण्यासाठी ७६ लाख ११ हजार, उद्यान विकास स्थापत्य कामांसाठी एक कोटी दोन लाख ३० हजार, खेळांसाठी आरक्षित असलेली मैदाने विकसित करण्यासाठी एक कोटी ३३ लाख ९५ हजार, दवाखाने बांधण्यासाठी एक कोटी ५० लाख, शाळांसाठी एक कोटी ७६ लाख ५० हजार, समाजमंदिर बांधण्यासाठी ५४ लाख, स्मशानभूमी बांधणे व नूतनीकरणासाठी एक कोटी १३ लाख ७५ हजार, रस्ते रुंदीकरण व नूतनीकरणासाठी दोन कोटी ९६ लाख, रस्त्यावरील दिवाबत्तीसाठी एक कोटी, इमारती विद्युतीकरणासाठी ४५ लाख आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी दोन कोटी ४५ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यानुसार, एकूण १४ कोटी ९२ लाख ६१ हजारांचा खर्च केला जाणार आहे.

Web Title:  Integrated development of Diva area, alliance of Mahasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.