भिवंडीत टोरंट पावर कंपनी विरोधात तीव्र आंदोलन; भर पावसात महिलांसह शेकडो नागरिक रस्त्यावर
By नितीन पंडित | Published: July 14, 2023 06:45 PM2023-07-14T18:45:31+5:302023-07-14T18:45:45+5:30
भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पावरच्या मनमानी कारभारा विरोधात सर्वपक्षीय टोरंट हटाव संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी तीव्र आंदोलन करण्यात आले.
भिवंडी: भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पावरच्या मनमानी कारभारा विरोधात सर्वपक्षीय टोरंट हटाव संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी तीव्र आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून भिवंडीत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.या मुसळधार पावसातही ग्रामीण भागातील शेकडो महिला व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. भिवंडी महापालिकेच्या समोर असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकातून दुपारी तीन वाजता या आंदोलनास सुरुवात झाली होती. धर्मवीर चौक ते न्यू कनेरी येथील टोरेंट पॉवरच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकला होता.यावेळी टोरेंट पॉवरच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत टोरंट हटाव भिवंडी बचाव,नही चलेगी नही चलेगी टोरंट की दादागिरी नही चलेगी या व अशा घोषणा देत टोरंट पावर कंपनीस असलेला विरोध दर्शविला.
हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा नसून सर्वसामान्य नागरिकांचा मोर्चा असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली.तर कामगार नगरी असलेल्या भिवंडीत कामगारांचा पगार सात हजार तर वीज बिल व त्यावरील दंड दहा हजार असा प्रकार आहे त्यामुळे आम्ही नागरिकांनी खायचे काय असा संतप्त सवाल मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केला. टोरंट कंपनीचा शहर व ग्रामीण भागात मनमानी कारभार सुरु असून,जास्त वीज बिल आकाराने,सक्तीने वीज बिल वसूल करणे,वीज चोरी बाबत नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे या व अशा अनेक जाचाला कंटाळून भिवंडीत शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी एकत्र येत हा लढा उभारला असून आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या पंधरा दिवसात विधानभवनावर मोर्चा नेऊ असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.त्यांनतर कृती समितीच्या शिष्ठमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन टोरंट पावर कंपनीच्या व्यवस्थापनाकडे सोपविला.
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात ही आंदोलनकर्ते रस्त्यावर ठाण मांडून उभे होते.कल्याण नाका येथे रस्त्यावर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने आंदोलनकर्त्यांना या साचलेल्या पाण्यातूनच जावे लागले तर रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या चेंबरमध्ये काही आंदोलनकर्ते पडल्याने आंदोलकांनी मनपा प्रशासनाचाही तीव्र निषेध केला.या आंदोलनामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.