‘पीएमसी’च्या खातेदारांमध्ये तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:04 AM2019-09-25T00:04:48+5:302019-09-25T00:05:04+5:30
पैसे काढण्यावर निर्बंध; बँकेच्या जिल्हाभरातील शाखांमध्ये गर्दी, सर्वत्र पोलीस बंदोबस्त
ठाणे/डोंबिवली : रिझर्व बँकेने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) वर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात ठाण्यातील ठेवीदारही कमालीचे संतप्त झाले आहेत. कासारवडवली, ब्रम्हांड, कळवा आणि शहरातील अनेक ठिकाणी जिथे बँकेच्या शाखा आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनी खातेदारांनी गर्दी केली होती. गांधीनगर शाखेच्या ठिकाणी तर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खातेदारांच्या मदतीसाठी काही भागातील नगरसेवकांनी बँकेच्या शाखेत धाव घेतली व नागरिकांच्या वतीने संबंधित बँकेच्या मॅनेजरला जाब विचारला.
रिझर्व बँकेने पीएमसी बँकेवर निर्बध घातले असल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले असताना ठाणे शहरातील सर्वच शाखांमध्ये बहुतांश खातेदारांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. शहरातील किसनगर, कासारवडवली, ब्रम्हांड, कापुरबावडी अशा काही ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत. किसनगर भागातील शाखेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: उपस्थित राहून खातेदारांची विचारपूस केली तसेच बँक मॅनेजरकडून सर्व माहिती घेतली. खातेदारांची रक्कम लवकरात लवकर त्यांना मिळावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. ढोकाळी शाखेतही खातेदारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बँक कर्मचारी आणि खातेदारांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.
खातेदारांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने दाद मागण्यात येईल, अशी माहिती भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी दिली. पीएमसी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद झाल्याची माहिती वेगाने पसरताच घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड शाखेत शेकडो ठेवीदार जमा झाले. या ठेवीदारांनी बँक कर्मचाऱ्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक डुंबरे यांनीही बँकेच्या शाखेत धाव घेतली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांकडून रिर्झव्ह बँकेकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांबाबत सविस्तर माहिती घेतली. ब्रम्हांड परिसरातील हजारो सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी, नोकरदार आणि गृहिणी आदींनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यातील सर्वच शाखांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, डोंबिवलीतील पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आल्यामुळे मंगळवार सकाळपासून बँकेच्या सर्व शाखांमधील त्याचबरोबर आॅनलाइन व्यवहार ठप्प झाले. आहे. दिवसाला केवळ एक हजार रु पये खातेदारांना काढण्याची मुभा असल्याने डोंबिवलीतील वैतागलेल्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या टाटा पॉवर शाखेसमोर गर्दी केल्याने एकच गोंधळ उडाला.
निर्बंधामुळे बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले होते. कल्याण पश्चिमेत खडकपाडा, पूर्वेत मलंगड रोड, डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर, ठाकुर्लीत जैन मंदिर पथ आणि लोढा हेवन परिसरात पंजाब महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. निळजे गावासह आजूबाजूची खेडी आणि लोढा हेवन, कासारिओ, पलावा यासारख्या उच्चभ्रू वसाहतीतील ग्राहक या शाखांबरोबर जोडली गेली आहेत. काहींनी त्यांची आयुष्यभराची पुंजी तर पलावासारख्या वसाहतीमधील नागरिकांनी मोठमोठ्या रकमेची ठेवी गुंतवणूक बँकेकडे केली आहे. निर्बंधामुळे चिंता लागलेल्या ग्राहकांनी बँकेच्या शाखांमध्ये गर्दी केली. शाखेतून एका वेळी देण्यात येणाºया केवळ हजार रु पयांमुळे पंचाईत झाल्याचे ग्राहकांनी सांगितले.
टाटा पॉवर शाखेशी १६ हजार खातेदार जोडलेले आहेत. २०१२ पासून ही शाखा कार्यरत असून सुमारे ६३ कोटी रु पयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या शाखेत अवघे १३ कर्मचारी काम करतात. ठाकुर्लीतील ग्राहकांनी यासंदर्भात नगरसेविका खुशबू चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी बँक प्रशासनाशी चर्चा करून ग्राहकांना तपशीलवार माहिती देण्यासाठी सांगितले, त्यानुसार स्थानिक बँक प्रशासनाने सगळयांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामुळे ग्राहक समाधानी झाले नव्हते.
गर्दीमुळे दोन महिला बेशुद्ध
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील पीएमसी बँकेसमोर पैसे काढण्यासाठी खातेदारांनी एकच गर्दी केली. रांगेत उभ्या असलेल्या महिला व नागरिकांनी बँकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला. गर्दीमुळे प्रचंड गोंधळ उडून मंगळवारी दोन महिला बेशुद्ध पडल्याची घटना घडली.
बँकेवर टाकलेल्या निर्बंधाची माहिती खातेदारांना मिळताच त्यांनी पैसे काढण्यासाठी बँकेत धाव घेतली. खातेदारांची गर्दी झाल्याने, बँक व्यवस्थापकांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त घेतला. पोलीस बंदोबस्त पाहून खातेदारांना आणखी भीती वाटू लागली.
पैसे काढण्यासाठी गर्दी, लोटालोटी, धक्काबुक्कीसारखे प्रकार घडून दोन महिला बेशुद्ध पडल्या. त्यांना इतर नागरिकांनी बाजूला नेवून पाणी दिल्यानंतर त्या शुद्धीवर आल्या.
दिव्यात खातेदारांचे ठिय्या आंदोलन
मुंब्रा : निर्बंधाच्या वृत्ताने हवालदील झालेल्या शेकडो खातेधारकांनी बँकेच्या दिव्यातील शाखेवर धडक देऊन, समाजसेविका अश्विनी केंद्रे, तसेच मेघा घरत यांच्या नेतृत्वाखाली बँकेत ठिय्या आंदोलन सुरु केले. बँकेने खातेदारांचे पूर्ण पैसे द्यावेत किवा पैसे काढून घेण्याची मर्यादा वाढवावी, अशी मागणी केंद्रे यानी यावेळी केली. बँकेकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. बँकेची कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही आंदोलन सुरु होते.
अंबरनाथ-बदलापुरात ग्राहकांचा गोंधळ
अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापुरातील पीएमसी बँकेच्या बाहेर खातेदारांनी मंगळवारी एकच गर्दी केली होती. बँक कर्मचारी त्यांचे समाधान करण्यास असमर्थ ठरल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर बँकेने ग्राहकांची समजूत काढली; मात्र बँकेत पैसे अडकल्याने ग्राहकांच्या चेहºयांवर निराशा दिसत होती.
ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचा दावा अधिकारी आणि कर्मचारी करित होते. मात्र त्यापुढे कोणतेही उत्तर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप निर्माण झाला होता. नेमके व्यवहार का थांबविण्यात आले, याची माहिती मिळत नसल्याने कर्मचाºयांना शिविगाळ केली जात होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याआधी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शाखांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला. संतापलेल्या खातेदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न अधिकारी आणि पोलीस करत होते. बँकेतून पैसे मिळतील, या आशेवर अंबरनाथच्या शाखेबाहेर ग्राहकांनी रांग लावली होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. नोटबंदीसारखी परिस्थिती सरकारने पुन्हा निर्माण केल्याची प्रतिक्रीया रोहित प्रजापती यांनी यानिमित्ताने दिली आहे.
बँकेत अनेक ठेकेदार आणि लहान कंपन्यांचे खाते असून, या कंपन्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. बँकेत पैसे अडकल्याने कामगारांचे पगारही रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. काही कामगारांचे बँकेत खाते असल्याने त्यांनादेखील पगार काढणे अवघड जात आहे.
कल्याणमधील गृहसंकुलांनाही फटका
कल्याण : पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील पीएमसीच्या शाखेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मंगळवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. या शाखेत शहरातील काही गृहसंकुलांचीही खाती असल्याने त्यांनाही फटका बसला आहे. शहरातील अनेकांनी आपल्या घरासाठी, वाहन खरेदीसाठी पीएमसी बँकेत पैसे जमा केले होते. कोणाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार होती, तर कोणी लग्नासाठी पैसे जमा केले होते. मुदत ठेवींच्या व्याजावर घर चालणारे खातेदारही मोठ्या संख्येने येथे आहेत. परंतु, त्या सर्वांचेच पैसे अडकले आहेत. खडकपाडा शाखेत गृहसंकुलांचीही खाती असल्याने संबंधित सोसायट्यांच्या सदस्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. गृहसंकुलात काम करणारे सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक यांचा पगार कसा द्यायचा, असा सवाल रौनक सिटी गृहसंकुलाचे खजिनदार शंकर बालनाईक यांनी केला आहे. या बँकेत दोन खाती उघडून नवीन व्यावसाय करण्यासाठी २० लाख रुपये जमा केले. आता सहा महिने कोणताच व्यवहार करायचा करता येणार नाही. बँकेच्या सुविधा बघून माझ्या मित्रांनाही या बँकेत खाते उघडण्याचा सल्ला दिल्याची माहिती विशाल चौधरी यांनी दिली.
संतप्त खातेदारांकडून तोडफोडीचा प्रयत्न
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर, इंद्रलोक व काशिगाव भागातील बँक शाखांमध्ये खातधारकांनी चांगलाच गोंधळ घातला. इंद्रलोक शाखेत खातेधारकांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. इंद्रलोकच्या ठाकरे मैदानासमोर शिवप्रसाद इमारतीत, तसेच शांतीनगर सेक्टर ५ व काशिमीरा येथील जनतानगर मार्गावर बँकेच्या शाखा आहेत. या शाखांमध्ये स्थानिक रहिवासी, व्यापाºयांसह बहुतांश गृहनिर्माण संस्थांनी खाती उघडली होती. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचे निर्बंधाबाबतचे संदेश खातेधारकांच्या मोबाइलवर आले. त्यामुळे खातेधारकांमध्ये खळबळ उडाली. यातूनच इंद्रलोक येथील शाखेत