आमिष दाखवून गाड्यांची परस्पर विक्री
By admin | Published: April 26, 2017 12:23 AM2017-04-26T00:23:57+5:302017-04-26T00:23:57+5:30
बँक , खाजगी संस्था तसेच फिल्मसिटीत वाहने चांगल्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून ती परस्पर विकणाऱ्या त्रिकुटाला ठाणे
ठाणे : बँक , खाजगी संस्था तसेच फिल्मसिटीत वाहने चांगल्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून ती परस्पर विकणाऱ्या त्रिकुटाला ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. तसेच त्यांच्याकडून एक कोटी २१ लाखांची एकूण १९ चारचाकी वाहने जप्त केली असून अशाप्रकारेची आणखी काही वाहने मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गुड्डू उर्फ जिलाजित रामचंद्र यादव (३५), विनोदकुमार आसाराम यादव (३५) आणि रामआश्रय बैजनाथ प्रजापती (३४) अशी या त्रिकुटाची नावे असून ते पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणारे आहेत. त्यांनी श्री गणेश इंटरप्राईजेस टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स् नावाची कंपनी उघडून ठाणे शहर, ग्रामीण, पालघर, मुंबई, नवी मुंबई परिसरातील वाहनमालकांना त्यांची वाहने बँक , खाजगी संस्था आणि फिल्मसिटी आदी ठिकाणी चांगल्या भाड्याचे आमिष दाखवून अनेक वाहन मालकांची वाहने भाडे करारपत्र बनवून चालविण्याकरिता घेऊन ती इतर व्यक्तींना आगाऊ पैसे घेऊन विकली. तसेच काही व्यक्तींकडून नवीन चारचाकी वाहने स्वस्तात मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन ते फसवणूक करीत होते. याचदरम्यान, कापूरबावडी पोलीस ठाण्यात बबलू दशरथ सिंह यांनी तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)