आंतरधर्मीय लग्न; गर्भवती बहीण, मेहुण्याचा खून, भावाला जन्मठेप
By जितेंद्र कालेकर | Published: May 6, 2024 10:11 PM2024-05-06T22:11:52+5:302024-05-06T22:12:31+5:30
उत्तरप्रदेशातील गावकरी आपल्या कुटुंबावर बहिष्कार टाकतील, या भीतीपोटी या दोघांसह तिच्या गर्भातील बाळाचीही या संतप्त भावाने ठाण्यातील डायघर भागात सात वर्षांपूर्वी हत्या केली होती.
ठाणे : आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून ‘सैराट’ स्टाईलने गरोदर बहिणीसह मेहुण्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी शफिक मन्सुरी (३६, रा. खेतवाडी, मुंबई, मूळ रा. हरदोई, उत्तरप्रदेश) याला ठाणे न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उत्तरप्रदेशातील गावकरी आपल्या कुटुंबावर बहिष्कार टाकतील, या भीतीपोटी या दोघांसह तिच्या गर्भातील बाळाचीही या संतप्त भावाने ठाण्यातील डायघर भागात सात वर्षांपूर्वी हत्या केली होती.
ठाण्याच्या डायघर गावातील सागर इमारतीमधील पहिल्या मजल्यावर १५ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घटना निदर्शनास आली हाेती. या घटनेत आंतरधर्मीय विवाह करणारी सुफिया मन्सुरी ऊर्फ प्रिया यादव (२२, रा. डायघर, ठाणे, मूळगाव उत्तरप्रदेश) आणि तिचा पती विजयशंकर यादव (३०) या दाम्पत्याची हत्या झाली होती. तिच्या गर्भातील मुलीच्या अर्भकाचाही पोटातून पाय बाहेर आल्याने मृत्यू ओढवला होता. या तिहेरी हत्याकांडानंतर शफिक त्या घराला बाहेरुन कुलूप लावून पसार झाला होता. घरातून दुर्गंधी बाहेर येऊ लागल्यानंतर चार दिवसांनी या दोघांच्या खुनाचे प्रकरण समोर आले. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा डायघर पोलिस ठाण्यात १५ सप्टेंबर २०१६ रोजी दाखल झाला होता.
शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने १९ सप्टेंबर २०१६ रोजी शफिकला अटक केली होती. या खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात ६ मे २०२४ रोजी झाली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता; मात्र भाऊ दागिने आणि कपडे घेऊन येणार असल्याची माहिती सुफियाने एका महिलेला दिली होती. आरोपीने ज्याच्याकडून चाकू खरेदी केला, त्या व्यापाऱ्याची साक्ष, घराबाहेर लॉक केल्यानंतर त्या चावीवरील रक्ताचे डाग आणि आरोपीच्या बोटांचे ठसे महत्त्वाचे दुवे ठरले. सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सांगितले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी काम पाहिले.