अंतर्गत मेट्रोला आता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:27 AM2020-01-05T01:27:51+5:302020-01-05T01:27:57+5:30
सैनिक स्कूलसाठी असलेल्या आरक्षण बदलास महासभेची मंजुरी मिळाल्याने आता त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून तो आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
ठाणे : ठाण्यातील अंतर्गत मेट्रोचे कारशेडसाठी कावेसर आणि कासारवडवली येथील हरित विभाग आणि सैनिकस्कूलसाठी असलेल्या आरक्षण बदलास महासभेची मंजुरी मिळाल्याने आता त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून तो आता अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर या कामासाठी सल्लागार नेमून पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
ठाण्यातून मुख्य मेट्रोलाइन ही हायवेवरून जाणार असल्याने या मुख्य मेट्रोपर्यंत प्रवाशांना जाता यावे, यासाठी महापालिकेने अंतर्गत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मान्यता या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. अंतर्गत मेट्रोच्या कामासाठी शहरातील डीपी रस्त्यांचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या २९ किमीच्या मार्गांपैकी १८ किमीच्या डीपी रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार, यासंदर्भातील रस्त्यांचे काही प्रस्तावही मंजूर केले आहेत. तसेच यामध्ये चार किमीच्या आरक्षित जागेचा वापर केला जाणार असून एचसीएमटीआर या वाहतूकव्यवस्थेसाठी सहा किमीच्या रस्त्यांचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.
>कासारवडवलीत १८ हेक्टरवर असणार कारशेड
यापूर्वी अंतर्गत मेट्रोच्या कारशेडसाठी कोपरी आणि बाळकुम याठिकाणी आरक्षण ठेवले होते. मात्र, यामुळे सीआरझेडचे क्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अंतर्गत मेट्रोचे आरक्षण करणे शक्य नसल्याने कावेसर आणि कासारवडवली या ठिकाणी ते होणार आहे.
अंतर्गत मेट्रोचा विस्तार वाढवण्यात आला असून अस्तित्वात असलेल्या डीपी रस्त्यावरून ती धावणार असून थेट वडवलीपर्यंत मुख्य रस्त्याला जोडण्यात येणार असल्याने याच ठिकाणी कारशेडचे आरक्षण ठेवण्यात येणार आहे. कासारवडवली येथे १८ हेक्टर जागेवर मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, यातील महत्त्वाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला दोन ते तीन महिन्यांत मान्यता मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. त्यानंतर, या कामासाठी सल्लागार नेमून या मार्गाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच, खºया अर्थाने या कामाला सुरुवात होईल, असे बोलले जात आहे.
>पाच टप्प्यांत ९६०० कोटी खर्चून विकास : अंतर्गत मेट्रोचा विकास पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून यासाठी सुमारे ९६०० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात कळवा-मुंब्रा या मार्गाचा विचार केला जाणार आहे. २०२५ ला जेव्हा ठाण्यात अंतर्गत मेट्रो धावेल, तेव्हा दररोज पाच लाख प्रवासीसंख्या या मार्गावर अपेक्षित धरली आहे. दोन किमीच्या अंतरासाठी कमीतकमी १७ रुपये भाडे आकारले जाणार असून त्यानंतर जास्तीतजास्त १०४ रु पयांपर्यंत भाडे आकारले जाणार आहे.
>ठामपा काढणार
६० टक्के कर्ज
मेट्रोच्या कामाचा खर्च हा सुमारे ९६०० कोटी एवढा असल्याने त्यासाठी ठाणे महापालिका ६० टक्के लोन काढणार आहे. तर, २० टक्के निधी केंद्र, २० टक्के पालिका स्वत: खर्च करणार असल्याचे बोलले जात आहे.
ही असणार स्थानके
प्रस्तावित नवीन ठाणे स्थानक, रायलादेवी, वागळे इस्टेट सर्कल, लोकमान्यनगर डेपो, शिवाईनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा-डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आजादनगर, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक परिसर, बाळकुमनाका, बाळकुमपाडा, राबोडी-शिवाजी चौक, ठाणे रेल्वेस्टेशन (भूमिगत)