राष्ट्रवादीत सुरू आहे अंतर्गत कुरबूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:19+5:302021-05-29T04:29:19+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन गट सक्रिय असल्याची बाब वारंवार समोर आली आहे. एक गट महापालिकेतील विरोधी पक्षाची ...
ठाणे : ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन गट सक्रिय असल्याची बाब वारंवार समोर आली आहे. एक गट महापालिकेतील विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून, दुसरा गट महाविकास आघाडीचा धर्म पाळत असल्याचे सांगत आहे. परंतु यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा अंतर्गत कुरबूर सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विरोधी पक्षनेत्याचे ऐकावे, की वेगळा मतप्रवाह असलेल्या पक्षातीलच ज्येष्ठ नगरसेवकाचे, या काेंडीत इतर नगरसेवक आणि पदाधिकारीदेखील अडकले आहेत.
दोन ते तीन महिन्यांपासून महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत आहे. रुग्णालयांना ऑक्सिजनचा प्रश्न असाे की रेमडेसिविरचा, राष्ट्रवादीतील विरोधी पक्षनेते शानू पठाण रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेली झाडांची पडझड, तसेच नालेसफाईवरून त्यांनी आंदोलन छेडले होते. ग्लोबल रुग्णालयातील गैरप्रकारावरूनही त्यांनी आवाज उठवला. परंतु त्यांच्या जोडीला अवघे दोन ते तीन नगरसेवकच असल्याचे वांरवार दिसून आले आहे. विरोधी पक्षनेता हा केवळ दोन ते तीन नगरसेवकांपुरताच मर्यादित आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. महासभेत विरोधकांचा आवाज म्यूट केल्याच्या निषेधार्थही त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. कुठेतरी त्यांची भूमिका रास्त असल्याचेच दिसत आहे. परंतु त्यांना त्यांच्याच पक्षातील विरोधक एकटे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधीच मुंब्य्राला विरोधी पक्षनेते पद दिल्याने इतर नगरसेवक नाराज झालेले आहेत. त्यामुळे आता एकाकी पाडण्याचा प्रयत्न पक्षातील इतर मंडळींकडून सुरू असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे या आंदोलनातून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला करीत आहेत. महासभेत त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांचा आवाज दाबला जात असताना मुल्ला मात्र आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळत असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या बाजूनेदेखील आता राष्ट्रवादीतील इतर नगरसेवक दिसत आहेत. शिवाय यापूर्वी आव्हाड समर्थक म्हणूनही मुल्ला यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु शानू पठाण यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातल्यानंतर मुल्ला आणि आव्हाड यांच्यातही काहीशी ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच कदाचित आघाडीचा धर्म पाळत असल्याचे सांगत मुल्ला पठाण यांच्या भूमिकेपासून लांब असल्याचे दिसत आहे. एकूणच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारानंतर राष्ट्रवादीत पुन्हा मुल्ला विरुद्ध पठाण असा सामना रुंग लागला आहे. हे वाद यापुढेही कायम राहिले तर राष्ट्रवादीला त्याचा फटका आगामी महापालिकेच्या निवडणुकीत बसू शकतो.