सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने कार्यशाळा संपन्न
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 13, 2022 05:55 PM2022-09-13T17:55:15+5:302022-09-13T17:55:56+5:30
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात आला.
ठाणे: आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने वायू प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष केंद्रीत करुन सामूहिक उत्तरदायीत्व व सामुहिक कृतीच्या आवश्यकतेबाबत जागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन ठाणे महानगरपालिका व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचेतर्फे संयुक्तपणे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेद्वारे या वर्षी हवा आपल्या सगळ्यांची या संकल्पनेस अनुसरुन आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा
पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने व कार्यशाळा यांचे आयोजन ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. याच मालिकेत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व उपआयुक्त अनघा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसाधना महाविद्यालयात कार्यशाळा व विद्यार्थ्यांसाठी हवा सर्वेक्षणाबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विश्वस्त कमलेश प्रधान यांनी पर्यावरण संवर्धन कार्यात महाविद्यालय नेहमीच ठामपास सहकार्य करेल असे आश्वासित केले.
प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी महाविद्यालयाद्वारे सामाजिक बांधिलकी जपून नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत व शहरातील पर्यावरणीय प्रकल्पांमध्ये ठाणे महानगरपालिकेस नियमितपणे करत असलेल्या सहकार्याबाबत उपस्थितांना माहिती देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. महाविद्यालयातील प्रा. डॉ. आसावरी टाक-शेणवाई यांनी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या यावर्षीच्या संकल्पनेस अनुसरून जागतिक स्तरावरील हवेच्या गुणवत्तेबाबत व हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केंद्र शासनाकडून उपलब्ध अनुदानातून ठाणे महानगरपालिकेद्वारे शहरात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याबाबत सादरीकरण केले.
कार्यशाळा संपन्न
ठाणे महानगरपालिकेचे वैज्ञानिक अधिकारी ओम परळकर यांनी हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत आंतरराष्ट्रीय व देश पातळीवरील कायद्यांबाबत व नागरीकांच्या मुलभूत अधिकारांबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे वैज्ञानिक अधिकारी राजू जाधव यांनी हवा सर्वेक्षणाकरिता उपलब्ध असलेल्या विविध पद्धती व संसाधनांबाबत सादरीकरण केले. सभागृहातील या कार्यक्रमानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या फिरती प्रयोगशाळा वाहनामध्ये सर्वेक्षणाबाबतचे प्रत्यक्ष प्रशिक्षण ठामपाच्या क्षेत्र अधिकारी संचिता कडलक यांनी दिले.