उल्हासनगर महापालिकेकडून जागतिक महिला दिन साजरा, महिलांसाठी विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 05:42 PM2023-03-08T17:42:37+5:302023-03-08T17:42:48+5:30
महापालिका महिला व बाळ कल्याण विभागाच्या वतीने पालिका सभागृहात जागतिक महिला दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
उल्हासनगर : महापालिका महिला व बाळ कल्याण विभागाच्या वतीने पालिका सभागृहात जागतिक महिला दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी शहरात विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आयुक्त शेख यांच्या संकल्पनेतून महापालिका सभागृहात महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील महिला शौचालय ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन मशीन व डीस्पोझल मशीनचे उदघाटन करण्यात आले. तसेच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार साठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर तसेच महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी मोफत संगणक, टायपिंग प्रशिक्षण, ब्युटीपार्लर कोर्स देण्याचा मानस यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केला. यावेळी आयुक्तांनी महापालिका महिला व बाळ कल्याण विभागाच्या विविध उपक्रमाचा आयुक्तांनी कौतुक केले आहे.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक लेंगरेकर, मुख्यलेखा अधिकारी किरण भिलारे यांच्यासह सिद्धांत सामाजिक संघटनेचे सत्यवान जगताप आदीजन उपस्थित होते.