काँग्रेसमधील १२ जणांनी दिल्या मुलाखती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:09 AM2019-07-30T00:09:13+5:302019-07-30T00:09:18+5:30
विधानसभा निवडणुकीची तयारी : कल्याण-डोंबिवलीतील मतदारसंघांचा घेतला आढावा
कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसचीही लगबग सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यासह आसपासच्या शहरांतील विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यात चार मतदारसंघ असून यापैकी तीन मतदारसंघांतील १२ जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून कोणीही इच्छुक नाहीत.
राज्याची विधानसभा निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. सप्टेंबरच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आतापासूनच प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीने नुकत्याच ठाणे येथे घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही सोमवारी कल्याण-मुरबाड रोडवरील एका सभागृहात कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, भिवंडी पूर्व-पश्चिम येथील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा प्रभारी कॅप्टन निलेश पेंढारी, मधू चव्हाण, चंद्रकांत हंडोरे आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधितांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
कल्याण पश्चिम विधानसभेसाठी पाच जण इच्छुक असून यामध्ये महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, प्रिया ताजणे, बबन ढमाले, कपिल सूर्यवंशी आणि प्रकाश मुथा यांचा समावेश आहे.
तर, कल्याण पूर्व मतदारसंघासाठी पॉली जेकब, शैलेश तिवारी, नवीन सिंग तर डोंबिवलीसाठी राधिका गुप्ते, जो.जो. थॉमस, दिलीप गायकवाड आणि नगरसेवक नंदू म्हात्रे इच्छुक आहेत. दरम्यान, काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि कल्याणमधील रहिवासी सुरेंद्र आढाव यांनी अंबरनाथ मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांचीही मुलाखत घेण्यात आली.
कल्याण ग्रामीण मतदारसंघ मित्रपक्षाला
कल्याण पश्चिम-पूर्व आणि डोंबिवली या तीनही मतदारसंघांतून इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सोमवारी दिसून आले. परंतु, कल्याण ग्रामीणमधून एकही इच्छुक नसल्याने हा मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. त्याला मधू चव्हाण यांनीही
दुजोरा दिला.