महारोजगार मेळाव्यात ३५ कंपन्यांच्या २६५७ रिक्त जागांसाठी मुलाखती
By सुरेश लोखंडे | Published: April 25, 2023 07:49 PM2023-04-25T19:49:34+5:302023-04-25T19:49:44+5:30
दाेन हजार ६५७ रिक्त जागांसाठी घेतलेल्या मुलाखतींमध्ये ४७ जणांना तत्काळ नियुक्त पत्र देण्यात आले.
ठाणे: येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नारी सशक्तीकरण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरा रोड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा अलिकडेच पार पडला. यात कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट आदी ३५ कंपन्यासाठी हा मेळावा घेतला. दाेन हजार ६५७ रिक्त जागांसाठी घेतलेल्या मुलाखतींमध्ये ४७ जणांना तत्काळ नियुक्त पत्र देण्यात आले.
या राेजगार मेळाव्याला आमदार गीता जैन, मिराभाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी यंग प्रोफेशनल आशुतोष साळ यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. मॉडेल करिअर सेंटर, ठाणे मार्फत देण्यात येणाऱ्या समुपदेशन आणि करिअर मार्गदर्शन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सुशिक्षित युवकांना करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.तर स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत प्रधानमंत्री मुद्रा योजने संबंधी माहिती देण्यात आली.