मच्छी मार्केटचा प्रस्ताव नव्याने सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:36 AM2019-07-26T00:36:44+5:302019-07-26T00:36:57+5:30

सभापतींचे आदेश : पुनर्विकासाच्या आराखड्यातील त्रुटींकडे वेधले लक्ष

Introduce fish market proposal | मच्छी मार्केटचा प्रस्ताव नव्याने सादर करा

मच्छी मार्केटचा प्रस्ताव नव्याने सादर करा

googlenewsNext

कल्याण : डोंबिवली पश्चिमेला रेल्वेस्थानकालगत असलेल्या मच्छी व मटण मार्केटच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत. मच्छी व मटणविक्रेत्यांकडूनही या प्रस्तावाला विरोध होत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव नव्याने सादर करावा, असे आदेश स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.

मच्छी व मटण मार्केटच्या पुनर्विकासासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाल्यानंतर सभापतींनी वरील आदेश दिला. मच्छी व मटण मार्केटच्या पुनर्विकासासाठी गिरीराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. हे काम तीन कोटी ७६ लाख रुपये खर्चाचे आहे. या कामासाठी आतापर्यंत पाच वेळा निविदा मागवल्याची माहिती केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी दिली.

प्रस्तावावरील चर्चेदरम्यान शिवसेना सदस्य वामन म्हात्रे म्हणाले की, सरकारच्या नियमानुसार इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर मच्छी व मटण मार्केट नसते. ते तळ मजल्यावर असले पाहिजे. केडीएमसी प्रशासनाने चुकीचा आराखडा तयार केला आहे. तसेच लाभार्थ्यांची नावे त्यातून वगळली आहेत. पादचारी पुलाच्या कामात बाधित झालेल्या १२ गाळेधारकांचे महापालिकेने पुनर्वसन केले आहे. असे असताना त्यांनाही या नव्या इमारतीत गाळे देण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे.

मच्छी व मटण मार्केटची मूळ जागा एक हजार ५२ चौरस मीटर आहे. मात्र, प्रत्यक्षात २९० चौरस मीटर जागेत इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. उर्वरित जागा मोकळी सोडण्याचे कारण काय, असा सवाल सदस्यांनी यावेळी केला. जागेचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्यावर तीन बाजूने सहा मीटर व एका बाजूने साडेचार मीटर जागेचे मार्जिन सोडल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. त्यावर कमी जागेत मार्केटची नवी इमारत बांधण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्नही उपस्थित केला गेला.

विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर सभापतींनी सांगितले की, हा प्रस्ताव चुकीचा आहे. त्यात अनेक त्रुटी आहे. त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव आला पाहिजे. आधी लाभार्थी निश्चित केले पाहिजेत. जागेचे प्रत्यक्षात सर्वेक्षण झाले पाहिजे. तळ मजल्यावर मच्छी व मटण मार्केट असले पाहिजे. सरकारचा त्यासंदर्भातील अध्यादेश विचारात घेऊन हा प्रस्ताव तयार करणे अपेक्षित आहे. मार्केटच्या विकासाचा चांगला आराखडा तयार करून हा प्रस्ताव नव्याने सभेसमोर सादर करा, असे आदेश त्यांनी दिले.

आराखडाही मंजूर नाही
मच्छी व मटण मार्केटसाठी जेथे नवी इमारत बांधली जाणार होती, त्या बांधकामाचा आराखडा मंजूर आहे का, अशी विचारणा सभापती म्हात्रे यांनी प्रशासनास केली. त्यावर नगररचना विभागाचे सहायक संचालक मा.द. राठोड यांनी आराखड्याला मंजुरी नाही, असे सांगितले. मग, आराखड्याला मंजुरी नसताना मार्केट कसे बांधता येईल? आराखडा मंजूर करावा. त्याच्या मंजुरीसह हा विषय परिपूर्ण प्रकारे सभेसमोर ठेवणे उचित होईल, असे सभापती म्हणाले.

Web Title: Introduce fish market proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे