आव्हाडांच्या उपस्थितीत झालेल्या मारहाणीची चौकशी करा; आमदार केळकर, डावखरेंची पोलीस आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 11:45 PM2020-04-07T23:45:58+5:302020-04-07T23:46:34+5:30
याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर फेसबूक कमेंट करणाऱ्या अनंत करमुसे यांना झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे, मोबाईल टॉर्च प्रज्वलित करण्याच्या आवाहनावर आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर घोडबंदर रोड येथील रहिवासी अनंत करमुसे यांनी कमेंट केली होती. त्यावरुन गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना घरातून आव्हाड यांच्या ठाणे येथील बंगल्यावर नेले होते. त्यानंतर ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी आव्हाडांच्या उपस्थितीतच १५ ते २० जणांनी करमुसे त्यांना मारहाण केली. पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाली असल्याचा करमुसे यांचा आरोप आहे. या मारहाणीच्यावेळी आव्हाड यांची उपस्थिती होती, असे वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत करमुसे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज आहे. फिर्यादीला पोलिसांनीच बेकायदा थेट मंत्र्यांच्या बंगल्यावर नेले. त्यानंतर पोलिसांसमोरच १५ ते २० जणांनी मारहाण केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात फिर्यादीला आणण्यात आले. या प्रकरणात खुद्द मंत्र्याचाच सहभाग असल्याचा आरोप असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार केळकर आणि डावखरे यांनी फणसळकर यांच्याकडे केली आहे.