वारंवार लागणाऱ्या आगीची सखोल चौकशी करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:25 PM2020-06-17T17:25:17+5:302020-06-17T19:04:09+5:30
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात वारंवार लागणाऱ्या आगीची चौकशी करण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्री आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील शहर विकास विभागात वारंवार आग लागत असून त्याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल तयार करावा आणि संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील शहर विकास विभागातील गैरव्यवहारामुळे व भ्रष्टाचारामुळे महापालिका इमारत आगीच्या सावटाखाली असून महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकारी आणि विकासक यांच्यातील संगनमताने झालेले गैरव्यवहार जनतेसमोर येण्याची कुणकुण संबंधित अधिकारीवर्गाला पुन्हा लागली आहे. त्यामुळे या संदर्भातील फाईल्स व कागदपत्रे गहाळ होऊ शकतात. याकरिता आग लावली गेली का शॉर्टसर्किट झाले याची संपूर्ण सखोल चौकशी व अहवाल तयार करून संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी केली. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून शहरविकासमधील काही कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली असून त्यात कोरोनाच्या कामासाठी अनेकजण हे कार्यालयात येत सुध्दा नाही. तसेच १ जून नंतर अनेक विकासक व वास्तुविशारद शहरविकास मध्ये उपस्थित होते. त्यामुळे १ जून ते आतापर्यंतच्या काळात शहरविकास विभागाचे सीसीटीव्ही फुटेज सुध्दा तपासणी करावे. जेणेकरून कोण कधी आले कोण कधी हे सुध्दा माहीत पडेल असेही कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. या आधीही कदम यांनी फायर ऑडिटची मागणी केली होती. मी 26 फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयातील सर्व विभागांचे फायर ऑडिट करावे जेणेकरून भविष्यातील जीवितहानी टळेल आणि कागदपत्रे सुरक्षित राहतील परंतु पालिकेने तसे केले नाही असे कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.