एनआरसी पाडकामप्रकरणी प्रत्यक्ष पाहणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:13+5:302021-03-04T05:17:13+5:30
कल्याण : आंबिवली, मोहने येथील एनआरसीने कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे पाडण्यास कशाच्या आधारे परवानगी ...
कल्याण : आंबिवली, मोहने येथील एनआरसीने कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे पाडण्यास कशाच्या आधारे परवानगी दिली, असा सवाल कामगार प्रतिनिधींनी केला असता घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील, असे आश्वासन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कामगारांच्या शिष्टमंडळास दिले.
एनआरसी कामगार संघर्ष समितीच्या वतीने जे.सी. कटारिया, भीमराव डोळस, रामदास वळसे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी माया कटारिया यांनी मंगळवारी आयुक्तांची भेट घेतली. एनआरसीही महापालिकेच्या हद्दीत येते. महापालिका हद्दीत एखादी इमारत धोकादायक झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानंतर तिचे पाडकाम केले जाते. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. एनआरसीची जागा कंपनी व्यवस्थापनाने लिलावात अदानी उद्योगसमूहाने विकत घेतल्यानंतर कामगार वसाहतीचे पाडकाम सुरू केलेले आहे. त्याला कामगारांचा प्रचंड विरोध आहे. महापालिकेने पाडकामाला परवानगी दिली आहे का, असा सवाल कामगार प्रतिनिधींनी या भेटीदरम्यान केला. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, उपायुक्त उमाकांत गायकवाड यांनी कंपनी परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल प्रशासनास सादर करावा, असे सूचित केले. या वसाहतीच्या परिसरात मोठी झाडे आहेत. पाडकामाच्या वेळी वटवृक्ष पाडले जात आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी वृक्ष पाडण्याआधी संबंधितांनी घेतली आहे का, असा प्रश्नही कामगार प्रतिनिधींनी केला. यावेळी आयुक्तांनी उद्यान अधीक्षक व महापालिकेचे सचिव संजय जाधव यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले.
चौकट-१
एनआरसीचा मालमत्ताकर थकला असून कंपनीने तो भरलेला नाही. मालमत्ताकराची एकूण थकबाकी ११४ कोटी रुपये असून महापालिकेने थकबाकीसह चालू कराची मागणी केली आहे. ही रक्कम कंपनीने मान्य केलेली नाही. त्यामुळे थकबाकी वसूलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका न्यायप्रविष्ट आहे.
चौकट-२
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी एनआरसी धरणे आंदोलनास दुपारी १ वाजता भेट देणार आहेत. हे आंदोलन गेल्या १६ दिवसांपासून सुरू आहे.
------------------