'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 09:38 IST2025-04-18T09:36:53+5:302025-04-18T09:38:33+5:30
Vishal Gavali Kalyan: विशाल गवळी हा कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
कल्याण : आपला मुलगा विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले किंवा त्याची हत्या केली, असा आरोप विशालची आई इंदिरा गवळी यांनी केला. विशालच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी विशाल हा तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
इंदिरा गवळी म्हणाल्या की, विशालने जेलच्या प्रसाधनगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तळोजा कारागृहातील पोलिसांनी सकाळी ६ वाजता फोन करून दिली. त्याने पहाटे ३ वाजता गळफास घेतला. त्याने आत्महत्या केली नसून त्याला मारले आहे. पोलिस त्याला टॉर्चर करत होते. मी एक अपंग वयोवृद्ध आहे. विशालचा मृत्यू झाला. त्याच्या मागे माझे दोन मुलगे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीची कारवाई केली आहे. माझा सांभाळ कोण करणार?
‘चौकशी समिती नेमा’
विशालचे वकील संजय धनके म्हणाले की, विशाल गवळीने आत्महत्या केली, याविषयी संशय आहे. तो जेलमध्ये असताना त्याच्या कुटुंबीयांशी बोलला होता की, त्याला टॉर्चर केले जात आहे. ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली, त्यावेळी त्याचे वडील आणि काका त्याठिकाणी गेले होते. त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली होती. विशालच्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी अथवा चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.