‘ईव्हीएम’प्रकरणातील ‘त्या’ व्हिडिओची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:46 AM2021-08-21T04:46:01+5:302021-08-21T04:46:01+5:30
कल्याण : ‘ईव्हीएम’ हॅक करून भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे निवडून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गायकवाड यांनी कोळसेवाडी ...
कल्याण : ‘ईव्हीएम’ हॅक करून भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे निवडून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा नोंदविला आहे. आता या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली असून, याबाबत चौकशी झाली पाहिजे. गायकवाड यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि धनंजय बोडारे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे केली आहे. बोडारे यांनी २०१९ ला गायकवाड यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. उल्हासनगरच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांकडेही तक्रार करून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
ईव्हीएम हॅक करून गायकवाड हे निवडून आल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान, ‘स्टिंग’मधील आशिष चौधरी याने गायकवाड यांच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण मध्यंतरी घडले होते. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गायकवाड यांनी स्वत: या प्रकरणी चौकशीची मागणी पोलिसांकडे केली आहे. यात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. या व्हिडिओमुळे तर्कवितर्कांना उधाण आले असताना शिवसेनेने गायकवाड, चौधरी तसेच गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि अन्य दोघांविरोधात पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जनआशीर्वाद यात्रेवरून वरिष्ठ स्तरावर सेना-भाजपचे राजकारण पेटले असताना आता स्थानिक पातळीवरही व्हायरल व्हिडिओवरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने दिसत आहेत.
‘हे तर बदनामीचे षड्यंत्र’
व्हिडिओ व्हायरल होताच मी स्वत:हून पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. या व्हिडिओसंदर्भात मी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. परंतु, विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे. यापूर्वीही मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा विरोधकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. आता पुन्हा हा विषय उकरून काढत बदनामी सुरू केली आहे.
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण (पूर्व)
---------------------