Ketaki Chitale : तपास अधिकारी अनुपस्थित, केतकी चितळेच्या जामीनाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:29 PM2022-06-10T19:29:40+5:302022-06-10T19:39:07+5:30
शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे हिला शुक्रवारीही जामीन मिळू शकला नाही.
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे हिला शुक्रवारीही जामीन मिळू शकला नाही. तपास अधिकारी अनुपस्थित राहिल्याने तिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १५ जून रोजी होणार असल्याचे जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरुद्ध १४ मे २०२२ रोजी बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कळंबोली येथून अटक केली आहे. याच गुन्ह्यात तिला सुरुवातीला पोलीस कोठडी मिळाली होती. नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. सुरुवातीला वकीलही न घेणाऱ्या केतकीने २६ मे रोजी जामीनासाठी अर्ज केला. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे स्पष्ट करीत न्या. डी. एच. परमार यांनी तिचा जामीन नाकारला.
यानंतर तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविण्यात आले होते. ही सुनावणी ६ जून रोजी होणार होती. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे न मांडल्याने ती १० जून रोजी होणार होती. मात्र, शुक्रवारी अर्थात १० जून रोजी तपास अधिकारीच गैरहजर असल्याने ही सुनावणी आता १५ जून रोजी घेणार असल्याचे न्या. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.