आगीच्या घटनेची यंत्रणा करणार चौकशी, मंत्रालयात झाली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:30 AM2020-02-21T01:30:48+5:302020-02-21T01:31:06+5:30
मंत्रालयात झाली बैठक : कामगार, व्यवस्थापक आणि कारखानदारांचे नोंदवणार जबाब
डोंबिवली : मेट्रोपॉलिटीन एक्झीम या रासायनिक कंपनीच्या आगीसंदर्भात गुरुवारी मंत्रालयात दिवसभर बैठक पार पडली. त्यामध्ये आगीचा घटनाक्रम जाणून घेत त्यावर चर्चा झाली असून, सर्व यंत्रणांनी त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे (डिश) कल्याण विभाग सहसंचालक विनायक लोंढे, एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शंकर वाघमारे, एमआयडीसीचे अधिकारी आदी त्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीतील आदेशानुसार आता आगीसंदर्भात पोलीस, एमआयडीसी, डिश, एमपीसीबी या सर्व यंत्रणा स्वत:च्या पद्धतीने चौकशी करणार आहेत. त्यानंतर, त्या यंत्रणांच्या कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करणार असल्याचे लोंढे म्हणाले. पण त्या चौकशीला, अहवाल तयार करण्यासाठी काहीसा वेळ लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आगीची चौकशी गुरुवारपासून मानपाडा पोलीस ठाण्यांतर्गत सुरू झाली आहे. बुधवारी रात्री आग शांत झाल्यानंतर पोलिसांनी स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सुरुवात झाल्याचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले. त्या कारखान्यात आग कशी लागली? कधी लागली? एवढे मोठे प्रमाण कसे वाढले? या मुद्यांखाली चौकशी सुरू झाली असून त्यात पोलीस कामगारांचे जबाब घेणार आहेत. कारखान्याचे मॅनेजर तसेच कारखानदार यांच्याशीही चर्चा करणार असून, त्यांचेही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
ं‘तो’ अहवाल पुढील आठवड्यात
धोकादायक कारखान्यांचा अहवाल पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांनी दिली. त्यानुसार, येत्या काळात कोणकोणत्या कंपन्यांचे स्थलांतर करायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या आदेशांनुसार धोकादायक, अतिधोकादायक, अशा स्तरावर ३११ कारखान्यांची पाहणी करण्यात आली होती.