गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या चौकडीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:48 AM2019-11-14T01:48:17+5:302019-11-14T01:48:24+5:30
कमी कालावधीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत ७१ गुंतवणूकदारांची तब्बल १२ कोटींची फसवणूक करणा-या चौघांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली.
ठाणे : कमी कालावधीत आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत ७१ गुंतवणूकदारांची तब्बल १२ कोटींची फसवणूक करणा-या चौघांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. गुंतवणूकदारांनी केजीएन सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेचा तपशील, गुंतवणूक केल्यावर देण्यात आलेले प्रमाणपत्र, पावत्या व इतर कागदपत्रे घेऊन ठाणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले आहे.
हारून रशिद अब्दुल सत्तार शेख (३५), मुकेश दत्तात्रेय मोरे (४२), सलमान सलीम शेख (२८) आणि नबील इक्बाल सुर्वे (२९) अशी अटक केलेल्या चौकडीची नावे आहे. या चौघांनी केजीएन सिक्युरिटी, केजीएन सिक्युरिटीज या योजनांचा जाहिरातींद्वारे, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे प्रचार केला. गुंतवणूकदारांना विविध मासिक व मुदत ठेवींच्या आकर्षक गुंतवणूक योजनेंतर्गत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून मनी सर्क्युलेशन स्किम सुरू केली.
मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून गुंतवणूकदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे परताव्याची रक्कम व मूळ रक्कम परत न देता ७१ गुंतवणूकदारांकडून १२ कोटी रुपये जमा करत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांच्या पथकाने मुलुंड येथील हारून शेख आणि कळव्यातील मुकेश मोरे या दोघांना ५ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्यानंतर मुंब्य्रातील सलमान शेख आणि नबील सुर्वे यांना ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. या चौकडीला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.