अंबरनाथच्या राज्य महामार्गावर अपघातांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:54+5:302021-07-29T04:39:54+5:30
अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग सध्या अपघाताचे केंद्र ठरत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक ...
अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग सध्या अपघाताचे केंद्र ठरत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक न लावल्याने तेथे अनेक वाहनचालकांचे अपघात हाेत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी लावलेले दुभाजकही वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. रस्त्याचे नव्याने काम होत असतानाही हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत असल्याने त्याकडे एमएमआरडीएने लक्ष देण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.
कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने एमएमआरडीएकडे वर्ग केला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करीत असताना पहिल्या टप्प्यात अतिक्रमण हटविता न आल्याने अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले. एमएमआरडीएच्या चुकीचा भुर्दंड आता अंबरनाथकरांना सोसावा लागत आहे. दरम्यान, रस्त्याच्या रुंदीकरणात आड येणारे अतिक्रमण हटविल्याने हे काम जलद गतीने होईल, अशी अपेक्षा होती. अतिक्रमण हटविल्यानंतर एमएमआरडीएकडे निधीच नसल्याने पुन्हा रस्त्याचे काम करण्यासाठी तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. उल्हासनगर आणि अंबरनाथमधील रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढल्यानंतर तीन वर्षांनी या रस्त्यासाठी पुन्हा निविदा निघाली. त्यामुळे जुना काॅंक्रीट रस्ता आणि नव्याने तयार होणारा काॅंक्रीट रस्ता त्यांच्या कामाच्या दर्जामध्ये बदल झाला. अनेक ठिकाणी चढ-उतारही निर्माण झाला. नव्याने काम सुरू झाल्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या खाली असलेल्या जलवाहिन्या अडचणीचा विषय ठरल्या होत्या. या जलवाहिन्या रस्त्याच्या वर असल्याने त्यांच्यावर कॉंक्रिटीकरण करणे शक्य होत नव्हते. या जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च अपेक्षित होता, मात्र पुन्हा निधी मिळणार नाही याची कल्पना असल्याने एमएमआरडीएने ठेकेदाराला सांगून, आहे त्या स्थितीत काम पूर्ण करण्याची घाई केली.
रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या भिंतीसोबतच अनेक ठिकाणी अपघातांना आमंत्रण देईल, असे काम एमएमआरडीएने केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजकही अपघाताचे केंद्र ठरत आहे. अनेक ठिकाणी दुभाजकाचे काम करताना सुरक्षाफलकच नाहीत. त्यामुळे रात्री वाहनांची धडक होत आहे. जुन्या काॅंक्रिटीकरणावरील पेव्हर ब्लॉकही जीर्ण झाल्याने आणि अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी खड्डे पडल्याने त्या खड्ड्यांत वाहने आदळून अपघात घडत आहेत. अद्याप विजेचे खांब न बसविल्याने रात्री खड्डे न दिसल्याने अपघात घडत आहेत. यासंदर्भात नागरिकांनी आणि रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
काेट
नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जास्त त्रास होत नाही; परंतु इतर शहरांतून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत.
- सुनील पाटील, नागरिक
रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षाफलक लावणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. त्यासंदर्भात वाहतूक विभागामार्फत ताकीद देण्यात आली आहे.
- सुनील जाधव, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
--------
फोटो आहे.