निमंत्रणपत्रिकेने नव्याने बदलला रंग!
By admin | Published: February 2, 2017 03:13 AM2017-02-02T03:13:57+5:302017-02-02T03:13:57+5:30
आधी वाटून झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आडनाव आणि कल्याण-डोंबिवली
ठाणे : आधी वाटून झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आडनाव आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेला श्रेय देण्यात आलेले नसल्याने नाराज झालेले महापौर राजेंद्र देवळेकर यांची समजूत काढण्यासाठी नवी निमंत्रणपत्रिका तयार करण्यात आली आहे. ती करताना त्यात आणखी अनेकांची नाराजी दूर करत तिचा रंगही अधिक गडद झाला आहे.
निमंत्रणपत्रिका हाती पडल्यापासून तिच्यावरून अनेक वाद झाले. आयोजकांपासून निमंत्रितांपर्यंत, सहकार्य करणाऱ्यांपासून शहरातील मान्यवरांत समावेश होत असलेल्या अनेकांची धुसफूस वाढली. त्यामुळे पुन्हा निमंत्रणपत्रिका छापून सर्वांची नाराजी दूर होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मूळच्या निमंत्रणपत्रिकेचा आराखडा कोणी तयार केला, त्यांना राजशिष्टाचाराचे भान नव्हते का? या चुका आधीच दुरुस्त करता आल्या नसत्या का, यावर आयोजकांतील कोणीही आता बोलण्यास तयार नाही.
नव्या निमंत्रणपत्रिकेत आगरी युथ फोरमच्या १९ सदस्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष सहकार्य म्हणून राजकीय नेते, पदाधिकारी यांच्या आधी असलेल्या १८ नावांत भर घालून ती ५६ वर नेण्यात आली आहे. त्यात आजी-माजी आमदार, पालिकेतील राजकीय नेते, विविध सभापती, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या भरगच्च राजकीय नेत्यांनी, पालिका पदाधिकाऱ्यांनी हस्ते-परहस्ते नेमके कोणते सहकार्य केले, त्याचा तपशील मात्र आयोजकांकडे उपलब्ध नाही.
ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत रोज वेगवेगळी पत्रके निघत असली, तरी त्यातील उपस्थितांची नावेही चारने वाढवून त्यात सुधीर जोगळेकर, अनिल वाघाडकर, उदय कर्वे, माधव जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे.
संमेलनाच्या उद््घाटन सोहळ्यात राजशिष्टाचारानुसार नावांचा क्रम बदलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, उद््घाटक विष्णू खरे यांची नावे सुरुवातीला घेण्यात आली आहेत. तसेच आधीच्या पत्रिकेत उद््घाटनाच्या सत्कारमूर्तींत समावेश असलेले नागपूर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा समावेश आता समारोपाच्या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींत करण्यात आला आहे.
उद््घाटनाच्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या पहिल्या कवी संमेलनात सहभागी कवींची नावेही वाढली आहेत. शिवाय, पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचाही समावेश नव्याने करण्यात आला आहे.
‘युद्धस्य कथा...’ या शनिवारच्या संवादात मान्यवरांच्या पदांत दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच त्या दिवशी शन्नांच्या नावे असलेल्या मंडपात संध्याकाळी ५.३० वाजता जर्मनीतील इंजिनीअर दिनेश क्षीरसागर यांच्या मुलाखतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
त्याच दिवशी डॉ. आनंदीबाई जोशी सभामंडपात संध्याकाळी होणाऱ्या ‘नवे कवी, नवी कविता’ या कार्यक्रमातील समन्वयक स्पृहा जोशी यांचे नाव वगळण्यात आले आहे.
कवी कट्टा या नावाने चालणाऱ्या काव्यहोत्रात आधी फक्त राजन लाखे समन्वयक होते. आता त्यात हेमंत राजाराम, सुप्रिया नायकर, डॉ. अनिल रत्नाकर, प्रशांत वैद्य यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)