मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गटातील सर्व आमदार-खासदारांना अयोध्या भेटीचे निमंत्रण
By अजित मांडके | Published: January 3, 2023 06:24 AM2023-01-03T06:24:29+5:302023-01-03T06:24:48+5:30
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली.
ठाणे : अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रूघन दास आणि छबिराम दास महाराज यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडवून आणले असून त्यांना प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्यानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली.
या महंतांचे आपल्या निवासस्थानी उचित स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन अयोध्येला येण्याचे देखील मान्य केले. यावेळी त्यांनी निश्चित तारीख सांगितली नसली तरीही लवकरच पक्षाचे प्रमुख नेते अयोध्येला जाऊन सर्व पाहणी करतील आणि त्यानंतर सर्वजण अयोध्येला येतील, असे महंत शशिकांत दास महाराज यांनी सांगितले.
या भेटीवेळी खासदार राहुल शेवाळे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊ चौधरी आणि नाशिकचे नगरसेवक अजय बोरस्ते हेदेखील उपस्थित होते.