IPL 2018 : सट्ट्याप्रकरणी कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलालला ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:43 AM2018-05-30T04:43:01+5:302018-05-30T04:46:47+5:30
मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली आहे.
ठाणे : आयपीएल तसेच क्रिकेटच्या इतर स्पर्धांवर जगभरातून सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुख्यात बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, मालाड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली आहे.
आयपीएलवर डोंबिवलीत सट्टा खेळला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याआधारे रामनगर परिसरातून १६ मे रोजी शर्मा यांच्या पथकाने गौतम सावला (५५), निखिल (२५, रा. दोघेही डोंबिवली) आणि नितीश पुंजानी (५५, रा. ठाणे) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेली सामग्रीही जप्त केली होती. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुढे खुशाल रामा भिया (४०, मालाड) आणि बिट्टू व्रजेश जोशी (२७, मुलुंड) या दोघांना मुंबईतून अलीकडेच ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
सोनू जलाल याचीही माहिती मिळाल्यानंतर त्याला २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शर्मा यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, उपनिरीक्षक रोशन देवरे आदींच्या पथकाने मुंबईतून अटक केली. त्याच्यावर मालाड (२००८), ओशिवरा (२०११), समाजसेवा शाखा (२०११), तर २०१५ मध्ये दिल्ली आणि अहमदाबाद येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. कासारवडवली आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.