इकबाल कासकरनेही केला होता अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर
By जितेंद्र कालेकर | Published: August 15, 2018 11:30 PM2018-08-15T23:30:45+5:302018-08-15T23:30:45+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर यानेही अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता.त्याचा मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी काही संबंध आहे का? याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर यानेही वापर केला होता. त्याने नेमकी कोणत्या एक्सचेंजचा गुन्हेगारी कारवायांसाठी फोनचा वापर केला, त्याचा मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी काही संबंध आहे का? याबाबतही सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
मुंब्य्रात चालणा-या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून शेहजाद शेख (३०), शकील शेख (४०) आणि मोहमंद खान (३६) या तिघांना मुंब्रा पोलिसांनी १३ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. यातील फरारी आरोपी वसीलउल्ला खान (३६) याच्या घरातून एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे तसेच चारही आरोपींच्या घरातून २९१ सिम कार्ड आणि लॅपटॉपसह १४ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. या आरोपींनी गेल्या वर्षभरात कोणा कोणाला या आंतरराष्टÑीय कॉल सुविधेचा वापर करुन दिला. तो किती कालावधीसाठी होता, यावरुन केंद्र सरकारचा किती महसूल बुडाला, याची चाचपणी करण्यासाठी बुधवारी डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनच्या अधिका-यांनी मुंब्रा पोलिसांकडून माहिती घेतली. कोणाला कॉल गेले किंवा आले? याचे तांत्रिक विश्लेषणही आता या अधिका-यांच्या मार्फतीने पोलिसांकडून करण्यात येत आहे. जे २९१ सिमकार्ड पोलिसांना मिळाले, त्या सिम कार्डच्या कंपन्यांची तसेच हे कार्ड पुरविणा-या डिलरची चौकशी करण्यात येत आहे. एरव्ही, इंटरनेट ते इंटरनेट कॉलींग केले जाते. पण ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधाच नाही त्यांना या टेलिफोन केंद्राद्वारे थेट दुबईतील नातेवाईकांशी बोलण्याची सुविधा दिली जात होती. दुबईतील ग्राहकाने भारतात फोन केल्यानंतर त्याचे प्रति मिनिट ६ पैसे कॉलचे बिल आकारले जात होते. जे बिल होईल ते मुंब्य्रातील हे टेलिफोन केंद्र चालविणा-या शेहजाद शेख आणि त्याच्या साथीदारांच्या बँक खात्यात जमा होत होते. त्यामुळे आता ही बँक खातीही गोठविण्याची प्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..........................
केवळ इनकमिंग सुविधा
या टेलिफोन केंद्राद्वारे भारतात केवळ येणा-या कॉलची सुविधा होती. त्यामुळे वरकरणी या केंद्राचा वापर मुंब्य्रातून नातेवाईकांना केल्याचा कांगावा होत असला तरी तो दहशतवादी कारवाया, खंडणी उकळणे यासाठी कुख्यात गँगस्टरांकडून तसेच हवालाचे रॅकेट चालविणा-यांकडून केल्याची शक्यता आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर यानेही अशाच प्रकारच्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर केल्याची पोलिसांची माहिती आहे. पण, ते एक्सचेंज कोणते? याबाबतचा तपास करण्यात येत आहे.
..............................
कासकर मोक्कांतर्गत कारागृहात
इकबाल कासकरविरुद्ध सप्टेंबर २०१७ ठाणेनगर आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका गुन्हयात चार फ्लॅटसह ३० लाखांची मागणी करुन त्याने एक फ्लॅट आणि ९० लाख रुपये एका बिल्डरकडून उकळल्याचा आरोप आहे. तर अन्य एका गुन्हयात तीन कोटी रुपये आणि बोरीवलीच्या गोराई येथील ३५ कोटींची ३८ एकर जमीनीची मागणी करुन दोन कोटी रुपयांसह ३५ कोटींची जमीन घेतल्याचा आरोप आहे. दोन्ही गुन्हयात त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.