‘मकोका’ रद्द करण्यासाठी इक्बाल कासकरची याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:19 AM2018-04-21T01:19:29+5:302018-04-21T01:19:29+5:30
आपल्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कठोर कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हे वगळण्याच्या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने ठाणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर न्या. ए.एस. भैसारे यांच्यापुढे सुनावणी झाली.
ठाणे : आपल्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कठोर कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हे वगळण्याच्या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने ठाणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर न्या. ए.एस. भैसारे यांच्यापुढे सुनावणी झाली.
व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याने कासकरवर ठाण्यात तीन गुन्हे आहेत. कासारवडवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ खालीही गुन्हा दाखल आहे. कासकरने ही कठोर कलमे लागू करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला विशेष मकोका न्यायालयात आव्हान दिले आहे. अॅड. श्याम केसवानी यांनी त्याच्या वतीने युक्तिवाद केला. मकोकातील तरतुदी या गुन्ह्यात लागू होत नाहीत. संघटित अथवा टोळी पद्धतीने गुन्हेगारी केली असली, तरच मकोका लागू केला जातो. तो लागू करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या मंजुरी आदेशात ठोस कारणे नाहीत, असे ते म्हणाले.
कासारवडवलीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी १८ सप्टेंबर २०१७ रोजी कासकर, इसरार सय्यद, पंकज गंगर, मुमताज शेख यांना अटक केली होती. त्यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाकडून फ्लॅट बळकावले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात छोटा शकीललाही आरोपी केले आहे. मात्र, शकील, कासकरचे संबंध पोलीस सिद्ध करू शकली नसल्याचा युक्तिवाद अॅड. केसवानी यांनी केला. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी ११ मे रोजी निश्चित केली आहे.